बारामती येथील कोरोना रुग्णांकडे पैशाची मागणी करणार्‍या आधुनिक वैद्यांचे स्थानांतर !

केवळ स्थानांतर करून न थांबता पुरावे घेऊन शिक्षा देणेच आवश्यक आहे. जेणे करून पुन्हा अशा चुका त्यांच्यासह अन्य कुणाकडून होणार नाहीत.

बारामती, ९ मे – कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करून घेतांना आणि रेमडेसिविर इंजेक्शन मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्या आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही घटना बारामतीच्या नर्सिंग हॉस्टेल येथील कोविड रुग्णालयातील असून त्या संबंधित आधुनिक वैद्यांवर कारवाई म्हणून अन्य विभागात स्थानांतर केले आहे.

याविषयीच्या अनेक तक्रारी प्रशासनास मिळाल्या होत्या. याची शहानिशा करण्यास सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे.

डॉ. सदानंद काळे यांनी सांगितले की, घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. या संदर्भातील पुरावे थेट मिळाले नसले तरी तक्रारींचे स्वरूप गंभीर असल्याने संबंधित डॉक्टरवर वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. (कोरोनाच्या भयंकर संकटकाळात आधुनिक वैद्यांनी रूग्णांना धीर देण्याऐवजी त्यांना लुबाडणे हे समाजातील माणुसकी आणि नैतिकता रसातळाला गेल्याचेच द्योतक ! – संपादक)