‘माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या अंतर्गत ४ दिवसांत ३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ मेच्या रात्री १२ ते १५ मे या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक दळणवळण बंदी घोषित करण्यात आली आहे. ‘माझा सिंधुदुर्ग माझी जबाबदारी’ या अभियानाला प्रारंभ केल्यापासून गेल्या ४ दिवसांत ३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्ह्यात कुडाळ एम्.आय.डी.सी.मध्ये ऑक्सिजन प्लांट लवकरच उभारण्यात येईल. जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींची गैरसोय होणार नाही. जवळपास २ लाख कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा येत्या २ दिवसांत होणार आहे, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.
दळणवळण बंदीविषयीची अन्य सूत्रे
१. सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे, अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी संबंधित असणार्या साहित्यांच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद रहातील.
२. कोरोनाचे नियम पाळून उपरोक्त दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीत घरपोच सेवा देऊ शकणार आहेत. आंबा वाहतुकीस अनुमती असणार आहे. कृषी अवजारे, शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीत चालू ठेवण्यास अनुमती आहे.
३. हॉटेल, रेस्टॉरंट यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी ११ ते दुपारी २ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू राहील.
४. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रास्त भाव दुकाने सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू रहाणार आहेत. जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू असणार आहेत.
५. लसीकरणाकरता प्रवास करणार्या व्यक्तींना आणि ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या अंतर्गत काम करणार्यांना यामधून सूट देण्यात आली आहे.
६. या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती अथवा संस्था यांवर भारतीय दंड संहिता १८६०(४५) च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ६२७ नवीन रुग्ण, तर ४ मृत्यू
१. उपचार चालू असलेले रुग्ण ४ सहस्र ४७४
२. बरे झालेले एकूण रुग्ण ११ सहस्र ३८४
३. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ३९७
४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १६ सहस्र २६१
कलंबिस्त पंचक्रोशीत एकाच दिवशी ५ जणांचे निधन
सावंतवाडी – तालुक्यातील कलंबिस्त पंचक्रोशीत ६ मे या एकाच दिवशी ५ जणांचे निधन झाले. या ५ जणांमध्ये माजी सैनिक सुभेदार रामा रूपा सावंत (वय ८२ वर्षे), माजी सैनिक दत्ताराम बिडवे (वय ४६ वर्षे) आणि माजी सैनिक एकनाथ देऊ पास्ते (वय ५७ वर्षे) हे तिघे कलंबिस्त गावातील असून शिरशिंगे येथील शांताराम वासुदेव राऊळ (वय ६५ वर्षे) आणि वेर्ले येथील देवजी दादू राऊळ यांचा समावेश आहे.