ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे दोघा आधुनिक वैद्यांकडून अल्प मूल्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार !

सर्वत्र रुग्णांची लूट चालू असतांना अल्प मूल्यात उपचार देणारे असे आधुनिक वैद्य, हे वैद्यकीय खात्याचे भूषणच होय ! सर्वत्रच्या आधुनिक वैद्यांनी यांचा आदर्श घ्यावा !

आधुनिक वैद्य अतुल मोरे

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – येथील आधुनिक वैद्य अतुल मोरे आणि प्रवीण पोरवाल यांनी गृह अलगीकरणातील १ सहस्र ५०० कोरोना रुग्णांना अवघ्या ५ ते ७ सहस्र रुपयांमध्ये उपचार करून बरे केले आहे. दोघेही प्रतिदिन कोरोना नसलेल्या १०० ते १५० रुग्णांवर औषधोपचार करत आहेत. दोघेही त्यांच्या रुग्णालयात पडताळणी करून रुग्णांना घरीच सेवा देत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसताच ते रुग्णांना पडताळणीसाठी शासकीय केंद्रावर पाठवतात.

आधुनिक वैद्य प्रवीण पोरवाल

कोरोनाबाधित रुग्णाला ५ दिवसांची औषधे दिली जातात. त्याचा व्यय साधारणत: १ सहस्र रुपये येतो. यातूनही रुग्ण बरा न झाल्यास त्याची ‘एच्.आर्.सी.टी.’ केली जाते. त्यानंतर अंदाजे १ सहस्र ५०० रुपयांची औषधे आणि आधुनिक वैद्यांचे सेवा शुल्क, असे एकूण ५ ते ७ सहस्र रुपयांमध्ये कोरोना रुग्ण बरे करण्याचा वसा या दोन्ही आधुनिक वैद्यांनी घेतला आहे. दोघांनी ‘प्रामाणिक आधुनिक वैद्य’, अशी ख्याती मिळवली आहे.