मराठा समाजाने संयम बाळगावा ! – अजयकुमार बंन्सल, जिल्हा पोलीस अधीक्षक

अजयकुमार बंन्सल

सातारा, ६ मे (वार्ता.) – मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मराठा समाजामनावरील परिणाम आम्ही समजू शकतो; मात्र कोरोनाच्या या कसोटीच्या काळात मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

अजयकुमार बन्सल पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदीची कडक कार्यवाही चालू आहे. आतापर्यंत विनामास्क फिरणार्‍या ४० सहस्र नागरिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून ९ सहस्र ५०० हून अधिक दुचाकी वाहनधारकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तसेच सामाजिक अंतर न पाळणे, नियमाहून अधिकवेेळ दुकाने उघडी ठेवणे अशा ८०० हून अधिक दुकानदारांवर पोलीसदल, महसूल विभाग आणि नगरपालिका यांच्या संयुक्त पथकाच्या वतीने गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. दळणवळण बंदीचे नियम पाळण्यासाठीच नागरिकांवर गुन्हे नोंद करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर सातारा पोलीस दलाचे संपूर्ण लक्ष असून सर्व नागरिकांनी दळणवळण बंदीचे नियम काटेकोरपणे पाळावेत.