श्रीनिवास रेड्डी यांच्याविषयी शासनाने मवाळ भूमिका घ्यावी ! – भारतीय वनसेवा असोसिएशनचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण

छायाचित्रात डावीकडे श्रीनिवास रेड्डी व उजवी कडे दीपाली चव्हाण

नागपूर – मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्याविषयी शासनाने मवाळ भूमिका घ्यावी, असे पत्र भारतीय वनसेवा असोसिएशनने (आय.एफ्.एस्.) मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. दीपाली चव्हाण यांना न्याय देण्याकडे दुर्लक्ष करून भारतीय वनसेवेतील काही अधिकारी तिच्यावर अन्याय करणार्‍या अधिकार्‍याला संरक्षण देण्यासाठी मात्र धडपड करत आहेत, असेच यावरून लक्षात येते.

हे आत्महत्याचे प्रकरण घडल्यापासूनच असोसिएशनने भारतीय वनसेवेतील अधिकार्‍यांची बाजू उचलून धरली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात वरिष्ठ वनअधिकारी विनोद शिवकुमार याच्यावर थेट आरोप असल्याने त्वरित निलंबन करून त्यांना अटक करण्यात आली; मात्र रेड्डी यांच्यावर थेट आरोप नसले, तरी शिवकुमार याला त्यांनी नेहमीच अभय दिल्याचा उल्लेख दीपाली यांनी पत्रात केला होता. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रोखण्यापासून आणि त्यांना अटक होऊ नये म्हणून भारतीय वनसेवा असोसिएशन रेड्डी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची श्रेयासाठी धडपड !

श्रीनिवास रेड्डी यांना गजाआड करण्यामध्ये स्वतःचे प्रयत्न कसे यशस्वी ठरले आहेत, हे सांगून त्याचे श्रेय लाटण्यासाठी पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर समोर आल्या आहेत. आता त्यांनी स्वतःच्याच रोखठोक भूमिकेमुळे शिवकुमारसह रेड्डी यांच्यावर गुन्हे नोंद झाल्याचे माध्यमांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. दीपाली यांनी तिच्यावर होणार्‍या अत्याचाराविषयी अमरावती येथील सर्वच लोकप्रतिनिधीचे उंबरठे झिजवले होते. श्रीमती यशोमती ठाकूर यांच्याकडेही तिने तक्रार केली होती; मात्र त्या जिवंत असतांना एकाही लोकप्रतिनिधीने एक पत्र समोर सरकवण्याव्यतिरिक्त त्यांच्या तक्रारीची गंभीर नोंद घेतली नाही. (महिला अधिकार्‍याच्या तक्रारीची एकाही लोकप्रतिनिधीने नोंद न घेणे, हे अमरावती जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे. – संपादक) आता रेड्डी यांच्या अटकेनंतर आपणच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाईसाठी चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, हे सूत्र रेटून धरले होते, असे ठाकूर यांनी पत्रकात म्हटले आहे. (दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केल्यानंतर श्रीमती यशोमती ठाकूर यांनी अधिकार्‍यांवर कारवाई होण्यासाठी धडपड चालू केली; मात्र दीपाली यांनी यशोमती ठाकूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी त्वरित शिवकुमार याला बोलावून त्याला समज का दिली नाही ?, कारण त्या पालकमंत्री आहेत. चव्हाण यांच्या तक्रारीविषयी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून चौकशी का केली नाही ? असे केले असते, तर दीपाली चव्हाण यांना पुन्हा मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचे धाडस शिवकुमार या अधिकार्‍याने केले नसते. – संपादक)