मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट; मात्र मृत्यूचे प्रमाण कायम

मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) – मागील आठवडाभरापासून मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या घटत आहे. १५ दिवसांपूर्वी मुंबईमध्ये दिवसाला ९ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत होते; मात्र मागील ५ दिवसांची आकडेवारी पहाता मुंबईमध्ये दिवसाला कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची सरासरी संख्या ४ सहस्र ५०३ इतकी आहे. या आकडेवारीवरून मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण अर्ध्याने अल्प झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण उणावले असले, तरी मुंबईतील कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या नागरिकांच्या संख्येत अद्यापही घट झालेली नाही. मागील ५ दिवसांत मुंबईतील कोरोनाबाधितांच्या मृत्यूची सरासरी ७० इतकी आहे. दुसर्‍या बाजूला मात्र मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येतील घट ही कोरोनाच्या चाचण्या अल्प केल्याचा परिणाम असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे.