कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

  • जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

  • देशात शाळा, महाविद्यालये बंद असतांना क्रिकेटचे सामने मात्र खेळवले जातात. पैसे कमावण्यासाठीच हे सर्व चालू आहे, हे जनता ओळखून आहे !
पिअर्स मॉर्गन

लंडन (ब्रिटन) – भारतातील कोरोना रुग्णवाढीची भयानक परिस्थिती लक्षात घेता आयपीएल् क्रिकेट स्पर्धा तात्काळ रहित करून देशात कोरोना रोखण्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. महामारीच्या काळात देशाचे संपूर्ण लक्ष हे विषाणू रोखण्याकडे असायला हवे. अशा कठीण काळात क्रिकेट स्पर्धा घेणे हे अर्थहीन आहे, अशी टीका ब्रिटनचे सुप्रसिद्ध टीव्ही पत्रकार पिअर्स मॉर्गन यांनी केली आहे. भारतात सध्या आयपीएल् क्रिकेट स्पर्धा चालू आहेत. ९ एप्रिल पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि ३० मे या दिवशी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे सामने सध्या देहली, कर्णावती, मुंबई आणि चेन्नई येथे होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मॉर्गन यांनी ही टीका केली आहे. आयपीएल् स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच चालू रहाणार असल्याचे ठाम मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याआधीच व्यक्त केले आहे.

भारतात सध्या दिवसाला ३ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. कोरोनाची एवढी मोठी लाट आली असतांनाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व दायित्वशून्यतेचे आहे, असेही ते म्हणाले.