गुढीपाडव्यानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंड राज्यांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन 

वाराणसी – गुढीपाडव्याच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेश, झारखंड अन् बिहार या राज्यांमध्ये ‘ऑनलाईन’ प्रवचने आणि सामूहिक नामजप आदी उपक्रम राबवण्यात आले.

उत्तरप्रदेशमध्ये वाराणसी, कानपूर आणि लक्ष्मणपुरी येेथे ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन

गुढीपाडव्यानिमित्त वाराणसी येथे ४, तर कानपूर आणि लक्ष्मणपुरी येेथे प्रत्येकी एक ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवीन वर्ष साजरे का करावे ?, तसेच गुढी कशी उभारावी ? यांविषयी माहिती देण्यात आली. या प्रवचनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वांनी ‘अशा प्रकारे आम्ही नवीन वर्ष साजरे करू’, असे सांगितले.

धनबाद (झारखंड) येथे सामूहिक नामजपाचे आयोजन

नववर्षानिमित्त धनबाद येथे ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातन संंस्थेच्या सोम गुप्ता आणि कु. एकता राम यांनी गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले. यासमवेत प्रभु श्रीरामाचा सामूहिक नामजप करण्यात आला आणि येणारे नववर्ष शुभ अन् मंगलमय होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

पाटणा (बिहार) येथे ३ ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन

सनातन संस्थेच्या वतीने पाटणा येथे ३ ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या वेळी आध्यात्मिक उन्नतीसाठी कुलदेवतेचा जप आणि पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप का करावा ? याविषयी माहिती देण्यात आली. तसेच नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला का साजरे करावे ? यांविषयीचे महत्त्व सांगण्यात आले. ही प्रवचने आशा झा, रेणु सिन्हा, रेवती कुमारी आणि सीमा श्रीवास्तव यांनी घेतली. या प्रवचनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

क्षणचित्रे

१. जिज्ञासूंना प्रवचने अतिशय आवडली. त्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम परत परत घेण्याची मागणी केली.

२. प्रवचनामध्ये उपस्थित एका पुरोहिताने सांगितले की, हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे आपले कार्य अतिशय स्तुत्य आहे. मी स्वतःच्या मंदिरामध्ये लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग चालवण्याचा प्रयत्न करीन.

३. एका जिज्ञासूने सांगितले की, अशा प्रकारची माहिती आम्हाला कुणीच सांगितली नव्हती. त्यांनी धर्माविषयी महत्त्वाची माहिती दिल्याविषयी हिंदु जनजागृती समितीविषयी अनेक वेळा आभार व्यक्त केले.