करमाळा (जिल्हा सोलापूर) – उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टी.एम्.सी. पाणी उचलण्याच्या निर्णया विरोधात अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील केत्तुरे येथे उजनीच्या पाण्यात उतरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात २४ एप्रिल या दिवशी तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
या वेळी अतुल खुपसे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यासाठी वदायिनी ठरणार्या उजनी धरणातून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाच टी.एम्.सी. पाणी इंदापूर तालुक्याला पाणी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध योजना उजनी धरणावर अवलंबून आहेत. पाणी सोडण्यावरून कित्येक वेळा हाणामारी झाली आहे. यापूर्वी योजनेतून बारामतीसाठी पाणी नेण्यात आले होते. आता उजनी धरणातून इंदापूरसाठी पाणी नेत आहेत. याचा आम्ही निषेध करत आहोत.
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
कोरोनाचा संसर्ग वाढत असूनही प्रशासनाकडून आरोग्य सुविधा पुरवल्या जात नाहीत. रेमडेसिविर इंजेक्शनसह ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होत नाही. या असुविधांमुळे त्रस्त झालेले सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब पवार आणि बालाजी डोईफोडे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना दौर्याच्या वेळी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.