खडक पोलीस ठाणाच्या हद्दीतील पशूवधगृहातून ३ गोवंशियांची सुटका

कासेवाडी येथे गोमांस विकणार्‍या ३ दुकानांतून ७ टन गोमांस सापडले

गोवंशियांची हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – युवा सेनेच्या ४ कार्यकर्त्यांना चांदतारा चौक येथील पत्र्याच्या शेडमध्ये २ गायी आणि १ पारडे पशूवधासाठी ठेवले असल्याची माहिती मिळाली. खडक पोलिसांच्या साहाय्याने १७ एप्रिल या दिवशी पहाटे ४ वाजता तेथे धाड टाकून त्यांनी या गोवंशियांची सुटका केली आणि त्यांना द्वारकाधीश गोशाळेत सुखरूप सोडले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये शेडचा मालक समीर जाफर कुरेशी याच्यावर खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. रावसाहेब घाडगे यांनी तक्रार दिली होती.

त्यानंतर सकाळी ७ वाजता कासेवाडी, भवानी पेठ येथील बीफ विकणार्‍या दुकानासमोर २ पिकअप गाड्या उभ्या होत्या. त्यामधून गाय-वासरांचे मांस विक्रीसाठी उतरवण्यात येत होते. त्यामध्ये ७ टन गोमांस, गोवंशियांची कातडी, मुंडकी, पाय कातडी काढलेल्या अवस्थेत दिसले. रज्जाक खुरेशी, शहबाज खुरेशी, हर्षल वाडेकर आणि रिझवान खुरेशी यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ६ क व ९ अ लावण्यात आले. खडक पोलीस स्टेशनचे आनंद गोसावी यांनी तक्रार दिली. २ पिकअप गाड्या जप्त करण्यात आल्या. या वेळी मीठगंज पोलीस चौकीतील पोलीस तसेच पशूवैद्यकीय अधिकारी श्री. शिंदे यांनी उत्तम सहकार्य केले. या वेळी लोकेश कोंढरे आणि अन्य १० ते १५ गोरक्षकांनी विशेष सहकार्य केले.