आमदार अपात्रता प्रकरण
पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) – भाजपात गेलेले काँग्रेसचे १० माजी आमदार आणि इतर ५५ जण यांनी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे लेटरहेड आणि शिक्का अनधिकृतपणे वापरून बनवेगिरी केल्याच्या प्रकरणी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी येथील पणजी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी भाजपात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या १० माजी आमदारांच्या विरोधात २ वर्षांपूर्वी प्रविष्ट केलेली अपात्रता याचिका २० एप्रिलला फेटाळली होती. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने गोव्यातील काँग्रेस पक्ष भाजपात विलीन करण्याच्या ठरावाच्या आधारावर सभापती राजेश पाटणेकर यांनी हा निर्णय दिला होता. या पार्श्वभूमीवर गिरीश चोडणकर यांनी ही तक्रार प्रविष्ट केली आहे.
गिरीश चोडणकर यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन गोवा प्रदेश काँग्रेस समितीचा बनावट दाखला सिद्ध केला आणि तो प्रदेश काँग्रेस समितीचा दाखला असल्याचे भासवले गेले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीने १० जुलै २०१९ या दिवशी झालेल्या बैठकीत हा ठराव घेतल्याचे म्हटले आहे. हा दाखला गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे लेटरहेड आणि शिक्का (सील) अनधिकृतपणे वापरून सिद्ध करण्यात आला आहे. संबंधितांवर भारतीय दंड संहितेेच्या विविध कलमांतर्गत कारवाई करावी.