परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काळानुसार सिद्ध करण्यात आलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप ऐकल्यावर साधकांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘काळानुसार श्रीरामाचे तारक आणि मारक तत्त्व अधिकाधिक मिळावे’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात श्रीरामाचे जप सिद्ध केले आहेत. या जपामागे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प असल्याने त्यात अधिक चैतन्य जाणवते. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक जप लहान, मध्यम आणि मोठ्या आवाजात ऐकवल्यावर त्याचा आध्यात्मिक त्रास असलेल्या आणि आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. या वेळी रामनाथी आश्रमातील त्रास असलेल्या साधकांना जपातील चैतन्य सहन न झाल्याने जाणवलेले त्रास आणि साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिले आहेत. 

१. ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ नामजप (तारक जप)

१ अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना जाणवलेले त्रास

१ अ १. सौ. आकांक्षा

१ अ १ अ. नामजप ऐकतांना आध्यात्मिक त्रासात वाढ झाली आणि रामाविषयी मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पुष्कळ द्वेष वाटत होता, असे जाणवले.

१ अ २. सौ. शुभदा

१ अ २ अ. सकाळपासून चिडचिड होणे, तेव्हा ‘प्रयोग असावा’, असा विचार मनात येणे; परंतु प्रयोगापूर्वी मनात चित्रपटातील गाणी चालू न झाल्याने प्रयोगाचा स्तर पुढचा असल्याचे जाणवणे : ‘प्रयोगापूर्वी सकाळपासून एक प्रकारची चिडचिड होत होती. चिडचिड व्हायला स्थुलातील काहीही कारण नव्हते. ‘आज प्रयोग आहे का ?’, असा विचार माझ्या मनात आला; पण गेल्या आठवड्यातील अनुभवाप्रमाणे प्रयोगाच्या आधी चित्रपटातील गाणी चालू व्हायची, तशी या वेळी ती चालू नव्हती. त्यामुळे ‘प्रयोग पुढच्या स्तराचा आहे’, असे मला वाटले. सूक्ष्मातील वाईट शक्तींना ‘प्रयोग आहे’, हे कळते. ते त्याची सिद्धताही करतात; पण ‘प्रयोग कोणता आहे ?’, हे त्यांना कळू शकत नाही. ‘त्यांना न कळणे’, ही परात्पर गुरु डॉक्टरांची सूक्ष्मातील युद्धनीती आहे. त्यामुळे अकस्मात् आघात केल्यासारखे वाटते.’

१ अ ३. एक साधिका

१ अ ३ अ.  प्रयोगाच्या आधी शारीरिक आणि मनाची स्थिती चांगली नसणे अन् जप ऐकायला आरंभ केल्यावर ‘तो जप साधारण २ – ३ फूट दूर अंतरापासून आदळून परत जात आहे’, असे जाणवणे : ‘श्रीरामाच्या तारक जपाच्या आधी अनेक दिवसांपासून शारीरिक आणि मनाची स्थिती चांगली नव्हती. २ मासांपासून पोट दुखत होते आणि मणक्यातील गाठीमुळे, तसेच उजव्या हातात असह्य वेदना होत होत्या. श्रीरामाच्या जपाच्या प्रयोगाला आल्यावर तारक जप ऐकायला आरंभ केल्यावर ‘तो जप मला साधारण २ – ३ फूट दूर अंतरापासून आदळून परत जात आहे’, असे जाणवत होते.

१ अ ३ आ. जपातील ‘राम’ या अक्षरातील ‘म’ या अक्षरानंतर गायीच्या गळ्यातील घंटेप्रमाणे २ घंटांचा आवाज ऐकू येणे आणि या नादाचा मनावर चांगला परिणाम होणे : काही वेळाने तो जप ऐकत असतांना जपातील ‘राम’ या अक्षरातील ‘म’ या अक्षरानंतर गायीच्या गळ्यातील घंटेप्रमाणे २ घंटांचा आवाज ऐकू येत होता. हा नाद पुष्कळ सूक्ष्म जाणवत होता. हा नाद ऐकतांना मनाला शांत आणि पुष्कळ आनंद जाणवत होता. ‘या नादाचा मनावर पुष्कळ चांगला परिणाम होत आहे’, असे जाणवले.

१ अ ३ इ. मनात येणारे त्रासदायक विचार या जपामुळे न्यून होणे : ‘हा जप निर्गुण आहे’, असे जाणवले. या जपामुळे मनात येणारे त्रासदायक विचार पुष्कळ न्यून झाले. अनेक दिवसांपासून असलेली अस्वस्थता न्यून झाली. ही स्थिती प्रयोग झाल्यावर ३० मिनिटे टिकून होती.’

१ अ ३ ई. नामजपाचा आवाज वाढवत नेल्यावर त्रास वाढणे, जपाच्या वेळी आरंभी उजव्या हातात शक्ती नसणे आणि जप पूर्ण ऐकून झाल्यावर हातातील शक्ती वाढणे : जपाचा आवाज वाढवत नेल्यावर त्रास वाढत गेला. आवाज अल्प असतांना भाव, तसेच अधिक निर्गुण वाटले. आवाज वाढल्यावर शक्तीची आणि सगुण-निर्गुण स्पंदने जाणवली. आवाज अल्प असतांना शारीरिक वेदना वाढत होत्या. त्या मला सहन होत नव्हत्या. आवाज वाढवल्यावर त्रास झाला. जपाच्या वेळी आरंभी माझ्या उजव्या हातात शक्ती नव्हती. त्यामुळे हाताचा अंगठा थरथरत होता. नंतर जप पूर्ण ऐकून झाल्यावर त्रासदायक भाग न्यून झाला.’

१ अ ४. श्री. गौरव

१ अ ४ अ. जप चालू झाल्याक्षणीच वाईट शक्तीने मनात जपाविषयी नकारात्मक विचार घालणे, सकारात्मक होऊन नंतर गाढ झोप लागणे आणि उठल्यावर ताजेतवाने अन् हलकेपणा जाणवणे : ‘श्रीरामाचा तारक जप चालू झाल्याक्षणीच मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीने माझ्या मनात असा विचार घातला, ‘या प्रयोगात ध्वनीक्षेपकावर लावलेल्या या जपात उपाय करण्याची क्षमता नाही’; मात्र मला लगेच जाणवले, ‘हा विचार माझा नसून तो माझी या नामावरील श्रद्धा न्यून करण्यासाठी वाईट शक्तीने माझ्या मनात घातलेला विचार आहे’; म्हणून मी सतर्क झालो. काही वेळाने मला फार गाढ झोप लागली. ‘ती झोप होती कि ध्यान होते ?’, हे कळाले नाही; मात्र त्या अवस्थेतून बाहेर आल्यानंतर ताजेतवाने आणि हलकेपणा जाणवला.

१ अ ४ आ. त्रासामुळे गाणी म्हणणार्‍या आणि बडबड करणार्‍या साधकांमध्ये सहभागी न होता शांत रहाणे : अन्य साधकांना त्रास होत असल्याने ते गाणी म्हणत आणि बडबड करत होते; मात्र मी त्यांच्यात सहभागी झालो नाही. शांत राहिलो. असे प्रथमच झाले. नंतर मात्र मला जपाचा कंटाळा आला; मात्र मी शेवटपर्यंत शांत राहिलो.

१ अ ४ इ. दुसर्‍या दिवशी एका साधकाने ‘तुम्ही उत्साही आणि आनंदी दिसता’, असे सांगणे आणि स्वतःतही प्रयोगाचा ध्यास अन् सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाल्याचे जाणवणे : दुसर्‍याच दिवशी प्रयोगात नसणार्‍या अन्य साधकाने मला सांगितले, ‘‘तुमच्याकडे पाहून चांगले जाणवते. ‘तुम्ही उत्साही आणि आनंदी आहात’, असेही जाणवते.’’ मलाही माझ्यात प्रयोगाला जाण्याचा ध्यास आणि प्रयोगाविषयी सकारात्मक दृष्टीकोन आपल्यात निर्माण झाल्याचे जाणवले.

या जपामुळे माझ्यात हा आमूलाग्र पालट झाला.’

१ अ ५. कु. आसावरी

१ अ ५ अ. मंद आवाजातील तारक जपाचा वाईट शक्तीवर ‘स्लो पॉयझनिंग’प्रमाणे परिणाम होत असल्याचे जाणवणे : ‘स्लो पॉयझनिंग’मध्ये हळूहळू विषाचा परिणाम होऊन मनुष्य त्रास होत होत गतप्राण होतो. त्याप्रमाणे मंद आवाजातील तारक श्रीरामाच्या जपाचा मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीवर परिणाम होत आहे’, असे वाटले.’

१ आ. आलेल्या अनुभूती

१ आ १. कु. गायत्री जोशी

१ आ १ अ. आजूबाजूला पुष्कळ आवाज असूनही मन नामजपावर एकाग्र होऊन चंदनाचा सुगंध येणे आणि प्रभु श्रीरामचंद्राचे अस्तित्व जाणवणे : ‘आश्रमात दुपारी श्रीरामाचा नामजप लावला, तेव्हा नामजप श्‍वासाला जोडला जात होता आणि पुष्कळ शांतता अन् समाधान अनुभवायला मिळत होते. सायंकाळी जेव्हा नामजप ध्वनीवर्धकावर लावला, तेव्हा आजूबाजूला सर्व गोंगाट चालू असतांनाही मन त्या नामजपावर एकाग्र करता आले. ‘चंदनाचा सुगंध येत होता’, असे जाणवले. रात्री ध्यानाच्या आधी नामजप लावल्यानंतर आतून आनंद आणि समाधान जाणवत होते आणि नामजप आपोआप होऊन जिभेला गोडवा जाणवत होता. नामजप पुष्कळ आर्ततेने म्हटल्यामुळे दिवसभर प्रभु श्रीरामचंद्राचे अस्तित्व जाणवत होते आणि ‘मी तुझ्या समवेत सदैव आहे’, असे सांगून प्रभु श्रीराम मला आश्‍वस्त करत आहे’, असे जाणवून २ – ३ वेळा घंटानाद ऐकू आला.’

१ आ २. सौ. वैशाली मुद्गल

१ आ २ अ. नामजपाचे स्वर ऐकू येत असतांना हवेत तरंगत असल्याचे जाणवून आजूबाजूला गारवा जाणवणे, श्रीराम अन् परात्पर गुरुदेव यांची मानसपूजा होणे, जांभया येणे आणि भावजागृती होणे : ‘नामजपाचे स्वर ऐकू येत असतांना मी हवेत तरंगत असल्याचे वाटून आजूबाजूला गारवा जाणवत होता अन् आतून नामजप होत होता. त्या वेळी मला झोपही येत होती; पण तो नामजप मधुर मधुरही वाटत होता. माझ्या मनामध्ये कोणतेच विचार येत नव्हते. केवळ श्रीराम अन् परात्पर गुरु डॉक्टर यांचे स्मरण आणि मानसपूजा होत होती. मला चैतन्य मिळून जांभया येत होत्या, तसेच डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’

१ आ ३. सौ. शुभांगी सेंगर

अ. ‘प्रयोगात ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप लावला. तेव्हा सर्वप्रथम मला तो आवाज कु. तेजल यांचा न वाटता तो सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांचा वाटत होता.

आ. या प्रयोगाच्या वेळी मला ‘व्यासपिठावर परात्पर गुरु डॉक्टर श्रीरामरूपात सिंहासनावर बसले आहेत’, असे दिसत होते.’

१ आ ४. श्रीमती सुरेखा सरसर

१ आ ४ अ. मन शांत होऊन ध्यान लागणे, डोळ्यांतून भावाश्रू येणे आणि श्रीरामाच्या भजनाच्या ओळी आठवणे : ‘नामजप ऐकतांना माझे मन शांत होऊन ध्यान लागले होते. ‘नाम श्‍वासाला जोडून अंतर्मनापर्यंत पोचत आहे आणि तेथून परत बाहेर येत आहे’, असे जाणवून डोळ्यांतून भावाश्रू येत होते. त्या वेळी श्रीरामाच्या कृपेने मला भजनाच्या पुढील ओळी आठवल्या.

रामा तुझ्या दारी, पसरितो करा ।
भक्ती भीक घाला, दीनाच्या दयाळा ॥
रामा तुझ्या दारी पसरितो करा ॥’

१ आ ५. होमिओपॅथी वैद्या (डॉ.) आरती तिवारी

१ आ ५ अ. सहस्रारचक्रावर कमळाची कळी असून ती हळूवार उमलत असल्याचे जाणवणे, उर्वरित एकेका चक्रावरही क्रमाने तसेच जाणवणे आणि त्या वेळी सर्वत्र पिवळा प्रकाश दिसणे : ‘नामजप चालू होताच प्रथम माझ्या सहस्रारचक्रावर संवेदना जाणवल्या. ‘तेथे सूक्ष्मातून कमळाची कळी आहे आणि ती हळूवार उमलत आहे’, असे दृश्य दिसले. हळूहळू उर्वरित सर्व चक्रांच्या ठिकाणीही वरून खाली क्रमाने अशीच प्रक्रिया दिसली. जसजशी ही प्रक्रिया होत होती, तसतसे हलके आणि चांगले वाटत होते. नामजप चालू असतांना सर्वत्र पिवळा प्रकाश दिसत होता. ‘नामजपाचा स्तर निर्गुण आहे’, असे जाणवले.’

(क्रमशः पुढील गुरुवारी)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते, याची चाचणी करतात. याला सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग म्हणतात.
  • या लेखात/ कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या/संतांच्या/सद् गुरुंच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक