एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक दांपत्य मलहेर्बे यांच्याकडून सिंगापूर येथे गुढी उभारून नववर्षदिन साजरा !

कुठे हिंदु संस्कृतीनुसार नववर्षदिन साजरा करणारे विदेशी, तर कुठे पाश्‍चात्त्याचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरा करणारे जन्महिंदू !

सिंगापूर – स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचे (एस्.एस्.आर्.एफ्.चे) सिंगापूर येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे आणि त्यांच्या पत्नी सौ. इसाबेला मलहेर्बे यांनी चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेला (१३ एप्रिल या दिवशी) त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून हिंदु नववर्षदिन साजरा केला. सौ. मलहेर्बे यांनी गुढी उभारण्याविषयी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर गुढी उभारण्याविषयी माहिती घेऊन मलहेर्बे दांपत्याने त्यांची सदनिका जी ३७ व्या मजल्यावर आहे, त्याच्या छतावर ही गुढी उभारली. गुढी उभारल्यावर श्री. व्हिन्सेंट आणि सौ. इसाबेला मलहेर्बे यांनी ‘आमच्या साधनेला गती मिळू दे’, ‘ईश्‍वरी राज्याची स्थापना होऊ दे’, अशी प्रार्थना केली. ‘गुढी उभारतांना आमच्या मनाला हलकेपणा जाणवत होता’, असे श्री आणि सौ. मलहेर्बे यांनी सांगितले.

गुढी उभारल्यावर तिला भावपूर्ण प्रार्थना करताना श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे

हिंदु संस्कृतीनुसार गुढी उभारून नववर्ष साजरा करणार्‍या मलहेर्बे दांपत्याचा आदर्श भारतातील जन्महिंदूंनी घ्यावा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे हे एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनाखाली साधना करतात. ते पाश्‍चात्त्य संस्कृतीत वाढले आहेत. असे असतांनाही त्यांनी हिंदु धर्मानुसार कृती करून गुढी उभारली, हे कौतुकास्पद आहे.

हल्ली पाश्‍चात्त्यांच्या आहारी गेलेली भारतातील युवा पिढी १ जानेवारी या दिवशी नववर्ष साजरे करते. आजच्या तरुणांना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंच्या प्रथा आणि परंपरा या त्यांना बुरसटलेल्या वाटतात. याउलट विदेशी लोक हिंदु संस्कृतीचा अभ्यास करतात आणि त्याचे महत्त्व जाणून त्यानुसार आचरण करतात. हिंदूंच्या प्रथा, परंपरा हा हिंदूंना लाभलेला समृद्ध वारसा आहे. त्याचे मोल जाणून हिंदू साधना करतील, तो सुदिन !

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

गुढी उतरवतांना आलेली अनुभूती

‘गुढी उतरवतांना मला सूर्याभोवती तेजोमंडल दिसले. यापूर्वी मी असे दृश्य कधीही पाहिलेले नव्हते. मला ‘सूर्यदेवता आशीर्वाद देऊन या क्षेत्राचे रक्षण करत आहे’, असे जाणवले. हे पाहून माझा भाव जागृत झाला.’

– श्री. व्हिन्सेंट मलहेर्बे

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक