नागपूर – रस्त्यांवरील नागरिकांची गर्दी अल्प करण्यासाठी शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरात ६० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यांपैकी ५ ठिकाणी वाहनचालकांची ‘रॅपिड अँटीजेन कोविड’ चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये २५५ वाहनचालकांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १८ वाहनचालकांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली आहे. १८ एप्रिलपासून ही मोहीम व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे.
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांचे पालन नागरिक करत नाहीत. रस्त्यांवर गर्दी वाढत आहे. एखादा नागरिक कारण नसतांना फिरतांना आढळल्यास त्याची रस्त्यावरच ‘रॅपिड अँटिजेन चाचणी’ करण्यास पोलिसांनी प्रारंभ केला आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या साहाय्याने पोलिसांनी शहरात ५ ठिकाणच्या नाकाबंदी केंद्रांवर कोविड चाचणी चालू केली आहे. या चाचणीचा अहवाल लगेच प्राप्त होत असल्याने ‘पॉझिटिव्ह’ नागरिकांना विलगीकरण केंद्रात पाठवले जाते.