हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला ‘धर्मसंवाद’, म्हणजे श्रोत्यांशी संवाद साधणारा चैतन्यमय सत्संग !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. पू. (सौ.) उमा रवीचंद्रन यांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेल्या ‘धर्मसंवादा’ची जाणवलेली वैशिष्ट्ये

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

१ अ. प्रायोगिक स्तरावरील कार्यशाळा ! : ‘हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे घेत असलेला धर्मसंवाद ऐकणे, म्हणजे अध्यात्मातील विविध अंगांविषयीची प्रायोगिक स्तरावरील संपूर्ण कार्यशाळाच होय. हा धर्मसंवाद हा एक प्रकारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील एक अभ्यासक्रमच आहे.

१ आ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सत्संग घेत असतांना करत असलेल्या मुद्रा ! : ‘सत्संग घेतांना सद्गुरु पिंगळेकाका जेव्हा हातवारे करत असतात, तेव्हा ते एक प्रकारे मुद्राच करत आहेत’, असे मला वाटते. ज्यांना भाषा कळत नाही किंवा जे त्यांचा सत्संग लक्षपूर्वक ऐकू शकत नाहीत, त्यांनाही या मुद्रांमुळे त्यांच्या बोलण्याचा आशय समजतो.

१ इ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे जिज्ञासूंशी साधत असलेली जवळीक : धर्मसंवादाचा एक भाग म्हणून सद्गुरु पिंगळेकाका जिज्ञासूंच्या प्रश्‍नांची उत्तरे देतांना ते जिज्ञासूंना त्यांच्या नावाने संबोधतात आणि त्यांच्या प्रश्‍नाच्या काही भागाविषयी त्यांचे कौतुक करतात. त्या वेळी त्यांचे दोन्ही हात आशीर्वादाच्या मुद्रेत असतात. त्यामुळे प्रश्‍न विचारणार्‍या व्यक्तीच नव्हे, तर धर्मसंवाद ऐकणार्‍या अन्य श्रोत्यांशीही जवळीक साधली जाते. खरे तर त्यांच्या प्रीतीयुक्त आवाजात केवळ स्वतःचे नाव ऐकण्यासाठी काही जणांना त्यांना प्रश्‍न विचारण्याची इच्छा होते. ‘धर्मसंवाद’, म्हणजे केवळ एक व्याख्यान, भाषण किंवा एक सत्संग नाही, तर तो ‘धर्मसंवाद’ आहे. ‘या सत्संगात कुणीतरी व्याख्यान देतो आणि अन्य केवळ ऐकतात’, असे नसते, तर सत्संग घेणार्‍याशी श्रोते जोडलेेले असतात अन् ते त्यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसन करून घेऊ शकतात. त्यामुळे या सत्संगाला ‘धर्मसंवाद’ हे नाव यथार्थ ठरते. सद्गुरु पिंगळेकाका प्रश्‍न किंवा शंका विचारणार्‍या जिज्ञासूला त्याच्या नावाने संबोधून त्याचे कौतुक करतात किंवा त्याला प्रोत्साहन देतात. त्यामुळे ‘ते माझ्याशीच बोलत आहे’, असे प्रत्येक जिज्ञासूला वाटते.

१ ई. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समर्पक उत्तरे देणे : काही वेळा धर्मशास्त्राविषयीच्या अज्ञानामुळे जनमानसात अपसमज निर्माण झालेले असतात. त्यामुळे श्रोते कधीकधी अध्यात्मशास्त्रातील काही विषयांचे कठीण प्रश्‍न विचारतात. अशा वेळी सद्गुरु पिंगळेकाका इतक्या चांगल्या प्रकारे उत्तरे देतात की, त्यातील सर्व सूत्रे सर्वांच्या अंतर्मनात झिरपतात आणि त्यांच्या मनावरील अयोग्य संस्कार किंवा अपसमज मुळापासून पालटला जातो. एका धर्मसंवादाच्या वेळी मला हे प्रकर्षाने जाणवले, उदा. एकदा ते अवयव दानाविषयी समजावून सांगत होते. त्यांनी त्याविषयीचे सत्य (वस्तुस्थिती) आणि शास्त्र पारदर्शकपणे समोर मांडले अन् निर्णय श्रोत्यांवर सोडला.

१ उ. श्रोत्यांवर सत्संगाचा परिणाम शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर होणे : समजायला सोप्या अशा प्रायोगिक स्तरावरील उदाहरणे आणि त्यांच्या मागे असलेले शास्त्रीय विवेचन सांगितल्याने श्रोत्यांना अवघड विषयही स्पष्टपणे समजतो, उदा. एका सत्संगामध्ये ‘काही शास्त्रज्ञांचा देवावर विश्‍वास का नसतो ?’, हे सद्गुरु पिंगळेकाकांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या उत्तरांमुळे श्रोत्यांवर स्थूल किंवा कृतीच्या स्तरावर तर परिणाम होतोच; पण त्यांना त्यावरील निश्‍चित उपाय मिळाल्याने त्यांचा मानसिक ताणही उणावतो. एवढेच नाही, तर ‘सूक्ष्मातून नेमके काय घडत असते ?’, त्याविषयी सांगितल्याने श्रोत्यांना त्याचे ज्ञान मिळते. अशा प्रकारे सद्गुरु पिंगळेकाका घेत असलेल्या सत्संगाचा परिणाम शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही स्तरांवर होतो. त्यांनी दिलेली उत्तरे परिपूर्ण असल्याने ती चैतन्याने ओतप्रोत भरलेली असतात. त्यामुळे ऐकणार्‍यांवरआध्यात्मिक लाभ होतात.’

– (पू.) सौ. उमा रवीचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (१३.४.२०२०)