सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – बांधकाम क्षेत्रात काम करणार्यांसाठी राज्यात ‘इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ’ कार्यरत आहे. या मंडळाकडे आता १२ लाख कामगारांची नोंद झाली आहे. त्यांना देणे असलेले आर्थिक लाभ तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी ‘भारतीय मजदूर संघा’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. वर्ष २०१६ पासून कामगारांचे लाभ प्रलंबित आहेत. दळणवळण बंदीच्या काळात संघाने कामगारांसाठी वस्तू वाटपात झालेला भ्रष्टाचार निदर्शनास आणून दिला. त्यामुळे कामगारांना वस्तू नको, तर आर्थिक सहाय्य आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
२. याविषयी ठराव करून तो केंद्राकडे पाठवण्यात आला. त्याला केंद्राची सकारात्मक साथ लाभली. केंद्राने कामगारांना वस्तू रूपात साहाय्य देण्यास बंदी घातली. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांचे थकित आर्थिक लाभ देण्यात यावेत.