रामनाथी, गोवा येथील आश्रमातील कु. प्रणाली कांबळे यांना नामजपाला बसल्यावर झालेले त्रास

कु. प्रणाली कांबळे

१. नामजपाला बसल्यावर डोळे बंद होऊन ‘मनातील भीती जाऊन नामजप चांगला होऊ दे’, अशी प्रार्थना होणे आणि प्रार्थना करतांना आरंभी मन विचलित होणे

‘६.१.२०१९ या दिवशी दुपारी ४.३० वाजता मी रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजपाला बसले होते. तेथे संतांना बसण्यासाठी ठेवलेल्या आसंदीकडे माझे सहज लक्ष गेले. तेव्हा माझे डोळे बंद झाले आणि माझ्याकडून ‘मला वाटत असलेली भीती जाऊन नामजप चांगला होऊ दे’, अशी प्रार्थना झाली. प्रार्थना करतांना आरंभी माझे मन विचलित झाले होते. ‘देवाला प्रार्थना आणि आळवणी करणे’, यात माझी १० मिनिटे गेली.

२. संतांना बसण्यासाठी ठेवलेल्या आसंदीकडे पाहिल्यावर एक तोंडवळा दिसणे आणि सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप आल्यावर त्यांना त्या तोंडवळ्याविषयी सांगणे

मी डोळे उघडून आसंदीकडे पाहिले. तेव्हा मला एक तोंडवळा दिसला. मी ‘त्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर काय जाणवते ?’, हे पहाण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या काहीच लक्षात आले नाही. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘तोंडवळ्याविषयी आपल्याला कळणे देवाला अपेक्षित असेल, तर खोलीत सूक्ष्म परीक्षण करणारे साधक येतील.’ त्यानंतर दोनच मिनिटांत सूक्ष्म परीक्षण करणारे श्री. राम होनप त्या ठिकाणी आले. त्या वेळी मी त्यांना मला दिसलेल्या तोंडवळ्याविषयी सांगितले.

३. तोंडवळ्याकडे पुनःपुन्हा लक्ष जाणे, ‘आसंदीवर संत बसले असतील का ?’, असा विचार मनात येणे आणि त्याविषयी विचारले असता ‘आज संत त्या आसंदीवर बसले नाहीत’, असे समजणे

रामदादांना सांगितल्यानंतरही माझे लक्ष पुनःपुन्हा त्या तोंडवळ्याकडे जात होते. ‘तेथे नेमके काय आहे ?’, असा विचार पुनःपुन्हा माझ्या मनात येत होता. तेव्हा ‘त्या तोंडवळ्याचा विचार करण्यापेक्षा नामजपाकडे लक्ष देऊया’, असा विचार करून मी नामजप करू लागले. नामजप करतांना ‘आसंदीवर संत बसले असतील का ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्याविषयी मी नंतर विचारले असता ‘आज संत त्या आसंदीवर बसले नाहीत’, असे समजले. तेव्हा रामदादा तेथून काही वेळासाठी खोलीबाहेर गेले होते.

४. ध्यान लागल्यासारखे होऊन त्या तोंडवळ्याशी एकरूप झाल्यासारखे जाणवणे आणि ‘ती शक्ती चांगली आहे कि वाईट ?’, असा प्रश्‍न पडणे

मी डोळे बंद केले. तेव्हा मला आदल्या दिवशी होत असलेल्या आध्यात्मिक त्रासाची आठवण झाली. त्यानंतर माझे ध्यान लागल्यासारखे होऊन मी त्या तोंडवळ्याशी एकरूप झाल्याचे जाणवले. मी एक मिनिटानंतर डोळे उघडले. तेव्हा मला ‘ती शक्ती चांगली आहे कि वाईट ?’, असा प्रश्‍न पडला.

५. पू. संदीप आळशी तेथे नामजप करण्यासाठी आले. तेव्हा मला ‘आसंदीवर दिसणार्‍या त्या तोंडवळ्याच्या उजव्या बाजूच्या डोळ्यातून पाणी येत आहे’, असे जाणवले.

६. ‘तोंडवळा कशासाठी तरी तळमळत आहे किंवा त्याला काहीतरी होत आहे’, असे मला जाणवलेे.

७. काही वेळाने श्री. राम होनप यांंनी ती त्रासदायक शक्ती असल्याचे मला सांगितले.

८. वरील प्रसंगाचा स्वतःवर झालेला परिणाम

अ. मी पुष्कळ वेळ नकारात्मक स्थितीत होते.
आ. मला पुष्कळ वेळ भीती वाटत होती.
इ. शरिरावरील आवरण काढूनही मला काहीच सुचत नव्हते.
ई. आरशामध्ये स्वतःचा तोंडवळा पहातांना मला त्याकडे पहावत नव्हते.

ही स्थिती दोन दिवस टिकून होती.’

– कु. प्रणाली कांबळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१.२०१९)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक