सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करणारी याचिका फेटाळली !

नवी देहली – आरोप करणारा तुमचा (अनिल देशमुख) शत्रू नव्हता; पण आरोप अशा व्यक्तीने केले आहेत जो जवळपास तुमचा उजवा हातच (परमबीर सिंह) होता. त्यामुळे तुम्हा दोघांची चौकशी झालीच पाहिजे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करणार्‍या याचिका फेटाळल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र सरकार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आव्हान याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केल्या होत्या.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणीचे आरोप केले होते. या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर ‘सीबीआयने १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करावा’, असा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले होते. त्यानंतर या आदेशाच्या विरोधात अनिल देशमुख आणि राज्य सरकार यांनी सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका प्रविष्ट केल्या.