सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना
(१) आमदार सुधीर गाडगीळ (२) आमदार सुरेश खाडे (३) पू. भिडेगुरुजी

सांगली, ८ एप्रिल (वार्ता.) – राज्यशासनाने घोषित केलेल्या अन्याय्य दळणवळण बंदीमुळे व्यापार्‍यांचे अतोनात हाल होत आहेत, कामगारांचे जगणे अवघड झाले आहे. समाजातील सर्व घटक यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यशासनाने घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या विरोधात व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष, जीमचालक, सामान्य नागरिक यांनी ८ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते. मोर्चाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मोर्चा समाप्त झाल्यावर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.