रात्री झोपेत गळ्यातील साखळीतून गुरुकृपायोगाचा ‘लोगो’ आपोआप निघणे आणि साखळी ‘लोगो’सह गळ्यातून निघून गादीवर पडणे

‘वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला माझ्या व्रतबंधनानिमित्त गुरुकृपायोगाचा ‘लोगो’ प्रसादरूपी भेट म्हणून दिला होता. ‘हा ‘लोगो’च माझे रक्षण करतो’, असे मला कायम जाणवते.

श्री. नीलेश कुलकर्णी

१. नारळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री झोपेत गळ्यातून साखळी आणि साखळीत अडकवलेला ‘लोगो’ गादीवर पडणे

अ. नारळी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे ३.८.२०२० या दिवशी रात्री मी निवासस्थानी झोपलो असता माझ्या गळ्यातील सोन्याच्या साखळीतून त्यात अडकवलेला गुरुकृपायोगाचा ‘लोगो’ आपोआप निघाला. सकाळी उठल्यावर गळ्यातील साखळी गळ्यातून निघून गादीवर पडलेली आणि त्या साखळीत अडकवलेला ‘लोगो’ही गादीवर वेगळा पडलेला आढळला. ‘साखळी गळ्यातून कधी निघाली आणि त्यातून ‘लोगो’ निघून तो कधी पडला’, हे मला समजलेच नाही.

आ. सकाळी उठल्यावर मला हे पाहून आश्‍चर्यच वाटले; कारण साखळी आणि ‘लोगो’ यांची कडी तुटलेली नाही किंवा ती निघालीही नाही. साखळीतून ‘लोगो’ निघू नये; म्हणून साखळीची कडी कायमस्वरूपी बंदिस्त केली आहे. त्यामुळे लोगो बाहेर निघून येणे शक्य नाही.

इ. वातावरणातील त्रास फार वाढलेला असतांना साखळी आहे तशी गळ्यातून बाहेर आल्याची घटना यापूर्वी २ – ३ वेळा घडल्याचे आता माझ्या लक्षात आले; पण आता साखळी केवळ गळ्यातून बाहेर आली, असे नाही, तर ‘तिच्यातील लोगोही वेगळा झाला’, हे विशेष. असे प्रथमच झाले.

२. झालेले त्रास

अ. या घटनेनंतर माझ्या मनात स्वतःच्या आरोग्याविषयी अनावश्यक भीती आणि नकारात्मकता यांच्या विचारांचे प्रमाण फार वाढले होते. मला त्याचा सतत ताण येत होता. माझा दिवसातील बराच वेळ त्या विचारांमध्येच जात होता.

आ. माझे शरीर अधूनमधून आतून गरम होत होते.

३. देवाने करवून घेतलेल्या उपाययोजना

अ. मी प्रार्थना आणि नामजप अधिकाधिक करण्याचा प्रयत्न केला. मी सतत ‘माझ्या समवेत साक्षात् भगवंत आहे’, तर मला कसली भीती ?’, असा विचार केला.

आ. ‘माझी श्रद्धा दृढ व्हायला हवी’, असा विचार मी अधूनमधून करत होतो.

इ. मी सांगितलेले सर्व मंत्रजप पूर्ण करण्याचा, तसेच आवरण काढणे, कापूर, अत्तर आदी नामजपादी उपाय करण्याचा प्रयत्न केला.

४. त्यानंतर मला होणारा त्रास बर्‍याच प्रमाणात उणावला.’

– श्री. नीलेश कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.८.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक