Republic Day Celebration 2025 : नवी देहली येथील प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाचे ५ मुंबईकरांना विशेष निमंत्रण !

मुंबई – नवी देहली येथील कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताकदिनाच्या संचलनाचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईतील ५ विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान यशस्वी योजना आणि अन्य विविध योजना याच्या अंतर्गत त्यांना बोलावण्यात आले आहे. मुंबई विभागातून अँटॉप हिल येथील अतुल जाधव, वसई (पश्‍चिम) येथील वैभव पाटील यांची ‘पंतप्रधान यशस्वी योजने’च्या श्रेणीतून निवड झाली आहे. ‘पद्मश्री ब्रह्मदेव पंडित आणि राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते अभय ब्रह्मदेव पंडित या पिता-पुत्रांना ‘महाराष्ट्र टेक्सटाईल’ (हस्तकला) श्रेणीअंतर्गत आमंत्रित केले आहे. बदलापूर (पश्‍चिम) येथील अंगणवाडी साहाय्यक आयुक्त उज्ज्वला पाटील यांना ‘डब्ल्यूसीडी’ या श्रेणीअंतर्गत आमंत्रित करण्यात आले.

या संचालनामध्ये देशभरातून १० सहस्र, तर महाराष्ट्रातून २३ विशेष पाहुणे उपस्थित रहाणार आहेत. त्यामध्ये पाच मुंबईकरांना हा मान मिळणे अभिमानाची गोष्ट आहे, असे निमंत्रित अतुल जाधव यांनी सांगितले.

‘मुंबईतील अंगणवाड्यांत लसीकरण ते पोषण आहारापर्यंत सर्व उपक्रमांत उत्कृष्ट कार्यवाही केल्यामुळे आमच्या विभागाचे कौतुक होते. प्रजासत्ताक कार्यक्रमासाठी माझे नाव सुचवल्यासाठी मला अभिमान आहे’, असे एकात्मिक बाल विकास योजना सेवा साहाय्यक आयुक्त उज्ज्वला पाटील यांनी सांगितले.

ब्रह्मदेव पंडित आणि अभय पंडित म्हणाले, ‘‘प्रजासत्ताकदिनी होणार्‍या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळणे, ही आमच्या सर्व कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा पूर्ण हस्तकला क्षेत्राचा सन्मान असून संचालन प्रत्यक्ष पहाण्याची अनेक वर्षांपासूनची इच्छा आता पूर्ण होत आहे.’’