ढाका (बांगलादेश) – शेख हसीना यांच्या जाण्यानंतर बांगलादेशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. अशात देशाला अराजकतेत जाण्यापासून रोखण्यासाठी सैन्याकडे आशेने पाहिले जात आहे; मात्र सैन्यात फूट वाढली आहे आणि ३ शक्तीकेंद्रे उदयास येत आहेत. या प्रत्येक केंद्राचे नेतृत्व एका जनरलकडे असू शकते. बांगलादेशाच्या सैन्यात सत्तापालट होणे हे काही नवीन नाही. १९७० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत २० हून अधिक उठावांचा सैन्याचा इतिहास आहे.
१. सध्याचे सैन्यदलप्रमुख वकार-उझ-जमान हे मध्यमार्गी आहेत आणि अजूनही सैन्यावर त्यांचे नियंत्रण आहे; परंतु सैन्यात आणखी २ शक्तीकेंद्रे उदयास आली आहेत. परिस्थितीशी परिचित असलेल्या लोकांच्या मते, एका सत्तेच्या केंद्राचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल महंमद शाहिनुल हक करतात. त्यांना बांगलादेश सैन्याच्या ९ व्या डिव्हिजनचे अवामी लीग समर्थित मेजर जनरल महंमद मोईन खान यांचे समर्थन आहे. हे सर्वांत शक्तीशाली डिव्हिजन मानले जाते.
२. सैन्याच्या दुसर्या गटाचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल महंमद फैजुर रहमान करतात. त्यांनी यापूर्वी सैन्याच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.