एप्रिल २०२० मध्ये काही काळासाठी श्री. निषाद देशमुख (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांची ‘सूक्ष्मातून ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे’, ही सेवा बंद झाली होती. त्यानंतर त्यांच्यामध्ये झालेल्या पालटांविषयी त्यांची बहीण कु. निधी देशमुख यांनी दिलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. दुसर्याची स्थिती समजून घेऊन आनंदाने साहाय्य करणे

‘निषादची साधना ज्ञानमार्गानुसार असल्यामुळे ‘कोणतीही समस्या आल्यावर त्याचा अभ्यास करून उपाय शोधणे, प्रत्येक कृती करण्यापूर्वी त्या विषयाचा संपूर्ण विचार करणे’, हा त्याचा स्वभाव आहे. कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये ही वृत्ती नसल्यामुळे पूर्वी त्याला हे स्वीकारता यायचे नाही; पण आता तो इतरांना आवश्यक ते साहाय्य आनंदाने करतो.
२. साधकांना बुद्धीच्या स्तरावर समजावून न सांगता त्यांच्या प्रकृतीनुसार त्यांना भावाचे प्रयत्न करायला सांगणे
‘ज्ञानयोगाच्या माध्यमातून बुद्धीचा निश्चय झाल्यावर मनाच्या चढ-उतारांचा साधनेवर परिणाम होत नाही’, हे निषादला ठाऊक आहे. त्यामुळे पूर्वी तो इतरांना बुद्धीच्या स्तरावर समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. आता तो इतरांच्या प्रकृतीनुसार ‘प्रार्थना करा, परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा करा, त्यांना शरण जा’, ‘भाव कसा ठेवायचा ?’ इत्यादी भाव-भक्तीशी निगडित सूत्रेही सुचवतो.
३. ‘ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे ’, ही सेवा थांबल्यावर त्या सेवेत न अडकता ‘सर्व ईश्वरेच्छेने होत आहे’, हा विचार करून निषादने हिंदी भाषांतराची सेवा मनापासून स्वीकारणे
निषादची ईश्वरी ज्ञान प्राप्त करण्याची सेवा थांबल्यानंतर ‘मला पुनः ईश्वरी ज्ञान मिळावे’, असा विचार त्याच्या मनात कधी आला नाही. ‘सर्वकाही ईश्वराच्या इच्छेने होत असते, ईश्वर जे करतो, ते आपल्या भल्यासाठीच करतो’, या विचारामुळे त्याने हिंदी भाषांतराची सेवा अगदी मनापासून स्वीकारली. तो ज्ञान प्राप्त करण्याची सेवा ज्या तळमळीने करत होता, तेवढ्याच तळमळीने हिंदी भाषांतराची सेवाही करत आहे.
४. सेवेमध्ये ‘श्रेष्ठ आणि कनिष्ठ’, असा विचार न ठेवणे
निषाद भाषांतराची सेवा नव्याने करत असल्यामुळे त्याला काही शब्द इतरांना विचारावे लागायचे. तेव्हा तो शिकण्याच्या स्थितीत राहून सेवा करायचा. ‘ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे’, ही सेवा श्रेष्ठ आणि ‘भाषांतर करणे’, ही सेवा कनिष्ठ’, असा विचार त्याच्या मनात कधी येत नाही.
५. भूतकाळाचा विचार न करणे
निषाद भूतकाळाचा विचार करत नाही. अनेकदा आपल्या मनात येते की, मी अमूक अमूक सेवा करत असते, तर मला संतांचे दर्शन झाले असते आणि त्यांचे मार्गदर्शनही मिळाले असते. निषादच्या मनात असे विचार येत नाहीत. ‘संत ईश्वराचे सगुण रूप आहेत आणि ज्याला आवश्यकता आहे, त्याला ते निश्चित मार्गदर्शन करतात’, अशी त्याची श्रद्धा आहे.
६. संतांना अपेक्षित अशी कृती तत्परतेने केल्यावर त्याचा कर्तेपणा न घेणे
एकदा ‘ऑनलाइन’ सत्संग पहातांना निषादला ‘एका कलाकृतीतून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवले. हे सूत्र त्याने त्वरित दायित्व असलेल्या साधकांना सांगून त्याला सुचलेले सर्व पर्यायही सांगितले. याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना कळल्यावर त्यांनी निषादचे कौतुक केले. तेव्हा त्याने कर्तेपणा न घेता ‘संतांच्या मार्गदर्शनामुळे जे शिकायला मिळाले, तेच मी कृतीत आणत आहे. यात माझे स्वतःचे काहीच नाही’, असे सांगितले.’
– कु. निधी देशमुख (श्री. निषाद यांची मोठी बहीण), ढवळी, फोंडा, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |