Mahakumbh 2025 Amrit Snan : साधू-संतांच्या अमृत स्नानाला, साक्षात् वरूणराजाही आला साक्षीला !

  • साडेतीन कोटी भाविकांनी केले महाकुंभपर्वातील पहिले अमृत स्नान

  • त्रिवेणी संगमस्नान आणि अमृतरूपी जलवर्षाव यांमुळे भाविक कृतकृतार्थ

  • नागा साधू ठरले विशेष आकर्षण

श्री. नीलेश कुलकर्णी, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज

अमृत स्नानासाठी लोटलेला भाविकांचा जनसागर

प्रयागराज, १४ जानेवारी (वार्ता.) – मकर संक्रातीच्या दिवशी येथील गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमावर साधू-संतांचे पहिले अमृत स्नान पार पडले. या अमृत स्नानाचे साक्षीदार होण्यासाठी साक्षात् वरूणराजाही उपस्थित झाला. कडाक्याची थंडी आणि त्यात अमृतरूपी जलवर्षाव यांमुळे देश-विदेशातील कोट्यवधी भाविकही कृतकृतार्थ झाले. अनुमाने ३ कोटी भाविकांनी महाकुंभपर्वातील पहिले अमृत स्नान केले.

आजच्या अमृत स्नानाला पहाटे ५.१५ वाजता आरंभ झाला. सर्व १३ आखाड्यांनी आपापल्या आखाड्यांतून भव्य मिरवणूक काढली. त्यांनी ठरलेल्या मार्गावरून संगमक्षेत्री भव्य-दिव्य प्रवेश केला. या वेळी प्रत्येक आखाड्यात सहस्रोंच्या संख्येने साधू, संत, महंत उपस्थित होते. सर्व आखाड्यांमध्ये नागा साधूंची संख्या लक्षणीय होती. आरंभी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी, श्री शंभू पंचायती अटल आखाडा, श्री तपोनिधी पंचायती श्री निरंजनी आखाडा, श्री पंचायती आनंद आखाडा, श्री पंच दशमान जुना आखाडा, श्री पंच दशनाम आवाहन आखाडा आणि श्री पंचाग्नी आखाडा या ७ संन्यासी आखाड्यांच्या साधू-संतांनी अमृत स्नान केले. त्या पाठोपाठ अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाडा, श्री पंच दिगंबर अनी आखाडा आणि श्री पंच निर्वाणी अनी आखाडा या ३ बैरागी आखाड्यांच्या साधू-संतांनी स्नान केले. शेवटी श्री पंचायती नया उदासीन आखाडा, श्री पंचायती बडा उदासीन आखाडा, तसेच श्री पंचायती निर्मल आखाडा या ३ उदासीन आखाड्यांच्या साधू-संतांनी अमृत स्नान केले. पहिल्या आखाड्याचा पहाटे ६ वाजताच संगम क्षेत्री प्रवेश झाला. आरंभी आखाड्यांतील साधू-संतांनी आणि त्यानंतर अन्यांनी स्नान केले.

दुसर्‍या बाजूनला सर्वसामान्य भाविकही अमृत स्नानाने न्हाऊन निघाले. अबालवृद्धांनी या स्नानाचा आनंद लुटला. या प्रसंगी भाविकांनी गंगा पूजन आणि आरती केली.

योगी सरकारकडून भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी !

भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारकडून भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यासह सर्व घाटांवरही सरकारने पुष्पवृष्टी केली.

क्षणचित्रे

१. साधू-महंतांसह भाविकांकडून ‘बम बम बोले’, ‘हर हर महादेव’ ‘जय श्रीराम’ आदी घोषणा उत्स्फूर्तपणे देण्यात येत होत्या.

२. आखाड्यांच्या मिरवणुकींत नागा साधूंनी त्यांच्याकडील तलवार, भाला, परशु आदी विविध शस्त्रांद्वारे त्यांच्या युद्धकौशल्याचे प्रदर्शन भाविकांना घडवले.

३. अनेक भाविकांनी पहाटे ३ वाजताच स्नानाला आरंभ केला. काही भाविक त्यांच्या वृद्ध माता-पित्यांना खांद्यावरून अमृत स्नानासाठी घेऊन आले होते.

४. अमृत स्नानाच्या सोहळ्यास अमेरिका, इस्रायल, फ्रान्स यांसह अनेक देशांतील भाविक उपस्थित होते.

५. संगमक्षेत्री पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

६. आरंभी ७ पैकी ६ पांटुन पूल (नदीवरून ये-जा करण्यासाठी वापरण्यात येणारा पूल) बंद ठेवण्यात आले होते; परंतु नंतर गर्दीनुसार ते टप्पटप्प्याने उघडण्यात आले. अमृत स्नानानंतर आखाडे ३ क्रमांच्या पांटुण पुलावरून मार्गस्थ झाले.

हरवलेल्या आप्तस्वकियांच्या शोधासाठी नातेवाईकांचा आक्रोश; पोलीस मात्र ढिम्मच !

हरवलेल्या भाविकांच्या शोधासाठी पोलिसांनी उद्घोषणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु संपूर्ण संगम परिसरात असा एकच कक्ष उभारण्यात आल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. हरवलेल्या आप्तस्वकियांच्या शोधासाठी नातेवाईक या ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे आक्रोश करतांना ऐकू येत आहे. पोलीस मात्र ही यंत्रणा उपलब्ध करून देण्यापुरतेच कर्तव्य बजावतांना दिसत आहे. त्यातही हरवलेल्या व्यक्तींच्या नावाने उद्घोषणा करून त्यांनी ‘पूल क्र. १ जवळ यावे’ असे आवाहन त्यांचे नातेवाईक करत होते. तथापि कुणालाच हा पुल कुठे आहे ?, हे ठाऊक नव्हते. त्यामुळे आणखी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. याविषयी भाविक संताप व्यक्त करत आहेत.