पोलिसांच्या अन्वेषणात निष्पन्न !
अमरावती – मेळघाटातील हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळेच दीपाली यांचा गर्भपात झाल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. शिवकुमारविरुद्ध यापूर्वीच आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद झालेला आहे.
‘दीपाली गर्भवती आहे’, हे माहीत असतांनाही विनोद शिवकुमार यांनी त्यांना २ दिवस पायी फिरवले. यामुळे त्यांचा गर्भपात झाला होता. ही गोष्ट दीपाली यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिली होती. पोलिसांनी अन्वेषणाच्या वेळी दीपाली यांनी त्या वेळी केलेल्या औषधोपचाराची कागदपत्रे हस्तगत केली आहेत, तसेच काही साक्षीदारांचे जबाबही नोंदवले आहेत. यातून शिवकुमार यांनीच त्रास दिल्यामुळे दीपाली यांचा गर्भपात झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तसेच शिवकुमार यांनी दीपाली यांना अनेकदा शिवीगाळ करून निलंबित करण्याची आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची धमकी देऊन अवमानित केल्याचेही अन्वेषणात पुढे आले आहे. त्यामुळे धारणी पोलिसांनी या गुन्ह्यात कलमे वाढवली आहेत.