मुंबई – महाराष्ट्राला कोरोनावरील १ कोटी ६ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८८ लाख डोसचा उपयोग करण्यात आला आहे. डोस वाया जाण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ सहस्र ३३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात प्रतिदिन ४ लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. ६ एप्रिल या दिवशी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेतला. या वेळी डॉ. व्यास यांनी वरील माहिती दिली.
मुख्य सचिव सीताराम कुंटे म्हणाले, ‘‘भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी राज्य सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे. संभाजीनगर, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि ठाणे या ६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. तेथे प्राधान्याने ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.’’