विजापूर (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांच्या आक्रमणात २२ सैनिक हुतात्मा !

  • ४०० नक्षलवाद्यांनी सैनिकांना घेरले !

  • नक्षलवाद्यांकडून रॉकेट लाँचरचा वापर !

  • जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद यांचा बीमोड न करणार्‍या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !
  • नक्षलवादी सैनिकांवर आक्रमण करून त्यांना ठार मारण्याच्या घटना वारंवार घडत असतांना सरकार त्यांच्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक कधी करणार ?
  • नक्षलवाद्यांकडे रॉकेट लाँचरसारखी शस्त्रे सापडतात, याचा अर्थ त्यांना त्याचा विविध माध्यमांद्वारे पुरवठा होतो. हे शोधून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !

विजापूर (छत्तीसगढ) – येथे ३ एप्रिलला झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी एकूण २२ सैनिकांना ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी येथे ४ सैनिकांचे मृतदेह सापडले होते, तर अन्य सैनिक बेपत्ता होते. त्यानंतर त्यांचेही मृतदेह सापडल्यावर एकूण हुतात्मा झालेल्या सैनिकांची संख्या २२ झाली. तसेच या चकमकीत ३१ सैनिक घायाळ झाले.

१. सुरक्षादलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात नक्षलविरोधी कारवाई करीत असतांना अचानक ४०० नक्षलवाद्यांनी आक्रमण केल्याचर चकमक उडाली.

२. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील सैनिक, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे सहस्रांहून अधिक सैनिक होते. (एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिक असतांना त्यांच्यावर ४०० नक्षलवादी आक्रमण करून त्यांना ठार करतात, हे चिंताजनक ! – संपादक)

३. नक्षलवाद्यांनी या सैनिकांना चारही बाजूंनी घेरले होते. संपूर्ण कट रचून या नक्षलवाद्यांनी सैनिकांवर आक्रमण केले. इतकेच नाही, तर या कटामध्ये आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथील नक्षलवादीही सहभागी होते, अशी माहिती समोर आली आहे.

४. चकमकीनंतर सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती. त्या वेळी बेपत्ता सैनिकांचे मृतदेह आढळून आले. अद्याप एक सैनिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. नक्षलवाद्यांनी आक्रमणासाठी रॉकेट लाँचरचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.

 

पंतप्रधान मोदी यांच्याकडून शोक व्यक्त

सैनिकांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि ते विसरणारही नाही. माझ्या सहवेदना छत्तीसगडमध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसमवेत आहेत. हुतात्मा सैनिकांचा पराक्रम विसरणार नाही. घायाळ सैनिक लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेनंतर म्हटले आहे.

‘आम्ही शत्रूला विरोधात कारवाई चालूच ठेवू’, अशी चेतावणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना दिली आहे.