सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी केली जतन आणि संवर्धनाच्या कामांची पहाणी

धाराशिव – श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील गाभारा आणि शिखर यांच्या जीर्णाेद्धाराच्या कामासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाचा निश्चित उपयोग करून घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिली. ८ मार्च या दिवशी श्री तुळजाभवानीदेवी मंदिरात चालू असलेल्या जतन-संवर्धनाच्या कामाची त्यांनी पहाणी केली आणि पुरातत्व विभागाच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

श्री तुळजाभवानीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात मंत्री शेलार यांचा मंदिर संस्थानच्या वतीने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी श्री तुळजाभवानी देवीचे चित्र, कवड्याची माळ आणि महावस्त्र देऊन सत्कार केला. या वेळी तहसीलदार, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि मंदिर संस्थानचे अधिकारी अन् कर्मचारी उपस्थित होते. |
पत्रकार परिषदेला अनेक मान्यवर उपस्थित होते. मंदिराचे शिखर आणि भिंती यांविषयी नव्याने उपस्थित झालेली सूत्रे लक्षात घेऊन केंद्रीय पुरातत्व विभागाचा अहवाल मागवण्यात येईल. त्यानंतर सर्वानुमते जीर्णोद्धाराचे पुढील काम होईल. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाची कामे दर्शनात कोणतीही अडचण येऊ न देता गतिमानतेने करावीत, असे निर्देश मंत्री शेलार यांनी पुरातत्व विभागाला या वेळी दिले. पुरातत्व विभागाची कार्यपद्धती ही आंतरराष्ट्रीय मानकानुसार आहे. मंदिराच्या जतन आणि संवर्धनाविषयी मोठ्यांपासून ते सर्वसामान्य भाविकांनी केलेल्या सूचनाही राज्य सरकार विचारात घेणार असल्याचे मंत्री शेलार या वेळी म्हणाले. आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, पुरातत्व विभागाने मुख्य मंदिराचे कामे सोडून अन्य कामे पूर्ण करावीत.

८ महिन्यांत सिद्धता पूर्ण करून, त्यानंतर ६ महिन्यांत विकासकामे पूर्ण करावीत. कळसाच्या वरच्या भागाला सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मंदिर भेटीच्या वेळी मंदिरातील आधीच आरक्षित केलेले काही अभिषेक झाले नाहीत. त्यामुळे संबंधित भाविकांनी नाराजी व्यक्त केली.