फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेचा ‘ऑनलाईन’ शुभारंभ
सातारा, ३१ मार्च (वार्ता.) – फलटण-पुणे लोहमार्गाचे स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जात आहे. याचा अत्याधिक आनंद झाला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले. फलटण-लोणंद-पुणे या मार्गावरील रेल्वेचा त्यांच्या हस्ते देहली येथून हिरवा झेंडा दाखवून ‘ऑनलाईन’ शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई येथून उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीनिवास पाटील ‘ऑनलाईन’ उपस्थित होते. तर प्रत्यक्षात फलटण येथील रेल्वे स्थानकावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, रेल्वे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या रेल्वेच्या माध्यमातून फलटण थेट पुण्याशी जोडले जाणार आहे. याचा लाभ शेतकरी, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी आदींना होणार आहे. गत अनेक वर्षे रेल्वेने मंद गती धारण केली होती; मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे रेल्वेने गती धारण केली आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छाशक्ती आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल याच्या उत्कृष्ट कार्यशैलीमुळे शक्य झाले आहे.
फलटण-पुणे रेल्वेला ‘लोकनेते स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर’ यांचे नाव द्या ! – उदयनराजे भोसले
या वेळी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, फलटणच्या रेल्वेमार्गासाठी स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यांच्यामुळे रेल्वेचे स्वप्न सत्यात उतरले आहे. त्यामुळे फलटण-लोणंद-पुणे या रेल्वेला ‘लोकनेते स्व. हिंदुराव नाईक-निंबाळकर’, असे नाव देण्यात यावे.