आरोग्यविषयीची संसाधने वाढत्या रुग्णांपुढे न्यून पडल्यास दळणवळण बंदी करावी लागते ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही. कोरोना संख्येच्या वाढत्या गतीपुढे आपली संसाधने न्यून पडू शकतात, अशी मला शंका वाटते. दळणवळण बंदी करण्याची कुणालाही हौस नाही; पण आपली संसाधने जर वाढत्या रुग्णांच्या पुढे न्यून पडत असतील, तर दळणवळण बंदी करावी लागते, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३० मार्च या दिवशी केले.

ते पुढे म्हणाले…

१. जर निर्बंध कडक करायचे असतील, तर कसे करावे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित कामगारांचे सूत्र उपस्थित झालेल्या क्षेत्राला हात लावू नये. अशा अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. त्याद्वारे निर्णय घेण्यात येतो.

२. लोकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे; मात्र लोकांचा निर्धास्तपणा हाच रुग्णसंख्या वाढण्याचे मुख्य कारण आहे.

लोकांचा जीव वाचवण्यासाठीच सरकार प्रयत्न करत आहे ! – मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख

लोकांची हानी होऊ नये; म्हणून आपण दळणवळण बंदी उठवली आहे. पुन्हा बंदी करण्याच्या मानसिकतेत आपण नाही. जर लोकांचा जीव, व्यवसाय आणि उत्पन्न वाचवायचे आहे, अशी परिस्थिती आली, तर लोकांचा जीव कसा वाचवता येईल, या मानसिकतेने सरकार प्रयत्न करत आहे, असे विधान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. ते ३० मार्च या दिवशी पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले…

१. बाजारपेठा, मॉल किंवा किराणा मालाची दुकाने अशा ठिकाणी लोक गर्दी करतात, तेथे बंधने लावण्यात येऊ शकतात.

२. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे; मात्र अन्य राज्यांमध्ये मात्र वाढत नाही. म्हणून आम्ही आय.सी.एम्.आर्.ला याविषयी पत्र लिहिले आहे.

३. मुंबई महापालिका, राज्यशासन, तसेच खासगी रुग्णालये येथे जागा शिल्लक आहेत. १६ सहस्रांपेक्षा अधिक बेड महापालिकेकडे आहेत. त्यामधील अजून ४ सहस्र बेड शिल्लक आहेत. अतीदक्षता विभागातही जागा आहे. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड राखीव आहेत. तसेच ८० रुग्णालयांना महापालिकेने आपल्या कह्यात घेतले आहे.

४. काही ‘जम्बो सेंटर’ बंद केले होते; पण आवश्यकता भासल्यास २४ घंट्यांत ती वापरूही शकतो.

नागरिकांनी नियम न पाळल्यास दळणवळण बंदी करावी लागेल ! – मुंबई आयुक्त इक्बालसिंह चहल

घरोघरी लसीकरण झाल्यासच कोरोनाला रोखणे शक्य होणार आहे. नागरिकांनी नियम न पाळल्यास दळणवळण बंदी करावी लागेल. दळणवळण बंदीचा निर्णय मुंबईकरांच्या हाती आहे.