ग्रामस्थांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
मालवण – तालुक्यातील खालची रेवंडी (तळाशील) येथील खाडीच्या किनार्यालगत असलेले कांदळवन आणि पत्तन विभागाने बांधलेला बंधारा काही व्यक्तींनी तोडला आहे. येथील खाडीपात्रात अवैधपणे जांभा दगड आणि माती टाकून मार्ग सिद्ध केला जात आहे. या अवैध बांधकामाविषयी प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याची नोंद न घेतल्याने अवैध बांधकाम मोठ्या प्रमाणात चालू आहे. (तक्रार करूनही अवैध बांधकामावर कारवाई न करणार्या प्रशासनातील उत्तरदायींवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक) हे अवैध बांधकाम करणार्यांवर कारवाई न झाल्यास ५ एप्रिलपासून खाडीपात्रातच उपोषण करू, अशी चेतावणी रेवंडी गावच्या सरपंचांसह ग्रामस्थांनी दिली आहे.
याविषयी सरपंच प्रिया कांबळी आणि माजी सरपंच युवराज कांबळी यांनी दिलेली माहिती
१. या अवैध बांधकामाविषयी प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे पुन्हा एकदा काही व्यक्तींनी अतिक्रमण करण्यास प्रारंभ केला आहे. कांदळवनातील छोटी झाडेही तोडण्यात आली आहेत. खाडीत अतिक्रमण करण्यासाठी गावातच अवैधपणे मातीचे उत्खनन चालू आहे. शासकीय सुटीच्या दिवशी हे अवैध प्रकार चालू असतात.
२. कांदळवन आणि बंधारा तोडल्यामुळे, तसेच येथे होणार्या अतिक्रमणामुळे खाडीचा प्रवाह पालटून रेवंडी, तळाशील परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. (जे जनतेच्या लक्षात येते, ते सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या प्रशासनाला समजत नाही कि एखादी मोठी घटना घडण्याची प्रशासन वाट पहात आहे ? असा प्रश्न जनतेला पडल्यास चूक ते काय ? – संपादक)
३. पावसाळ्यात खाडीला उधाण आले, तर मोठी हानी होणार आहे. याच ठिकाणी ग्रामस्थ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. मासेमारीही केली जाते. त्या सर्व गोष्टींवरही परिणाम होणार आहे.