एकलहरे, मंचर गावांच्या सरहद्दीवरील भूमीगत पूलनिर्मितीच्या मागणीसाठी शेतकर्‍यांचे आंदोलन !

प्रतिकात्मक छायाचित्र

मंचर (पुणे) – खेड ते सिन्नर मंचर बाह्यवळण चौपदरीकरण रस्त्यावर एकलहरे आणि मंचर (ता. आंबेगाव) या २ गावांच्या सरहद्दीवर भूमीगत पूल करावा या मागणीसाठी परिसरातील शेतकर्‍यांनी २६ मार्च या दिवशी रस्त्याचे काम बंद करून आंदोलन केले. तसेच १५ दिवसांत प्रश्‍न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करू, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र थोरात आणि शिवसेनेचे नेते संतोष डोके यांनी दिली आहे. यासाठी राज्याचे कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे.

पुणे-नाशिक रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. त्यातील खेड ते सिन्नरमधील बाह्यवळण रस्ता झाल्यावर ये-जा करणारी वाहने वेगाने प्रवास करतील. पुणे-नाशिक ते दाधारा देवी (मंचर) हा ५० वर्षे जुना रस्ता आहे. बाह्यवळण रस्ता बनतांना या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यामुळे मंचर आणि एकलहरे येथील १०० कुटुंबांना रस्ता ओलांडण्यास कायम अडथळा येईल आणि अपघातांचे प्रमाणही वाढू शकेल. मंचर येथील दाधोरा देवीच्या दर्शनासाठी प्रतिदिन शेकडो भाविक ये-जा करतात. तसेच शेतीमाल आणि दुधाची वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. येथे बाह्यवळण झाल्यामुळे येथील नागरिकांचे हाल चालू आहेत, त्यामुळे चिडलेल्या शेतकर्‍यांनी कंत्राटदारांची वाहने अडवून आंदोलन केले.