सुराज्य स्थापनेचे एक अंग : आदर्श पोलीस
पोलिसांविषयी वाचनात येणारी वृत्ते, त्यांचे चित्रपटांंमध्ये दाखवले जाणारे खलनायकीकरण यांमुळे आणि अनेकदा स्वत:च्या अनुभवांमुळे पोलीस अन् समाज यात अंतर पडल्याचे दिसून येते. हे खरेतर पालटायला हवे. समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत. – संपादक
१४ मार्च २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण कपड्याच्या गोदामाच्या आगीमध्ये शेष राहिलेल्या चांगल्या कपड्यांची लयलूट करणारे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे लोभी पोलीस, पालघर येथे जमावाकडून साधूंची हत्या होत असूनही निष्क्रीय रहाणारे अकार्यक्षम पोलीस आणि पोलिसांनी ‘मुंबई पोलीस कायदा १९५१’ या कायद्यातील कलमांचा अपवापर करणे यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/459004.html
५. मुंबईतील अवैध बांधकामांकडे पोलीस, लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे कर्मचारी यांनी दुर्लक्ष करण्यामागे ‘अर्थ’कारण असणे
५ अ. मुंबईमध्ये काही लोक सार्वजनिक ठिकाणची जागा बळकावून अवैध बांधकामे करतात. कालांतराने अशी बांधकामे नियमित केली जातात. या प्रक्रियेमध्ये स्थानिक नेते, स्थानिक पोलीस, पालिका कर्मचारी यांचे हात ओले केले जातात.
५ आ. काही झोपडपट्ट्या या मालकी हक्काने बांधलेल्या असतात. रहिवाशाने ठराविक उंचीच्या वर बांधकाम करून नियमाचे उल्लंघन केल्यास नगरसेवक, पालिका कर्मचारी आणि पोलीस त्याच्याकडून लाच घेतात. अवैध कामांवर लक्ष ठेवणारे महानगरपालिकेचे ‘अतिक्रमण भरारी पथक’ पोलिसांकडे तक्रार करते. त्यानंतर पोलीस ‘MRTP Act १९६६’ प्रमाणे कारवाई करतात. (काही प्रकरणांमध्ये पोलीस महापालिकेला कळवून नंतर ते बांधकाम पाडले जाते.) अशा प्रकरणांमध्ये संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करते.
५ इ. मुंबईमध्ये अजूनही काही झोपडपट्टी भागात अनधिकृत बांधकामे केली जातात. त्यामध्ये स्थानिक नगरसेवक, पोलीस, महानगरपालिका अधिकारी यांचा समावेश असतो. ही साखळी वरपर्यंत असते.
५ ई. काही वर्षांपूर्वी मुंबईतील नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अल्पसंख्यांक व्यक्ती बांधकामाचे कंत्राट घेत असे. (अशा कंत्राटदाराचे पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्याशी संमनमत असते. त्यामुळे तो घरमालकाकडून अधिकचे पैसे घेतो. अशा ठिकाणी प्रशासन लक्ष घालत नाही.) हा कंत्राटदार लहान लहान चाळींच्या दुरुस्तीचे बांधकाम करण्याचे काम करत होता. त्याच्याकडे पोलीस अधिक पैशांची मागणी करण्यास गेले. तेव्हा त्याने छुपे छायाचित्रक लावून पैसे घेतांनाचे पुरावे सिद्ध केले. त्यानंतर त्याने ४० पोलिसांची लिखित स्वरूपात सूची सिद्ध केली आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांवर गुन्हे प्रविष्ट होऊन त्यांचे निलंबन झाले.
६. अवैधपणे चोरीचा ऐवज खरेदी करणार्या सराफाकडून पोलिसांनी हप्ता घेणे
काही भुरटे चोर सार्वजनिक मालमत्ता उदा. तांब्याची केबल, लोखंड इत्यादींची चोरी करतात. नंतर ते हे चोरीचे साहित्य काही भंगारवाल्यांना विकतात, तसेच काही सोनसाखळी चोर सोन्याचे दागिने चोरून ते अल्प भावात सराफाला विकतात. असे चोरीचे साहित्य घेणारे भंगारवाले आणि सराफ यांची पोलिसांना आधीच माहिती असते. अशा लोकांकडून पोलीस हप्ता वसूल करतात. चोरीचा ऐवज खरेदी करणार्या नाशिकमधील एका सराफाकडून १ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संगमनेर येथील पोलीस उपनिरीक्षक राणा प्रतापसिंह परदेशी यांना नुकतीच अटक केली. संगमनेर तालुक्यामध्ये काही मुलांनी मित्राच्या साहाय्याने स्वत:च्याच घरातून अनुमाने सव्वा दोन लाख रुपयांचे दागिने चोरले आणि ते नाशिकच्या सराफाला विकले. या प्रकरणाचे अन्वेषण परदेशी यांच्याकडे होते. परदेशी यांनी सदर गुन्ह्यात आरोपी करू नये, यासाठी सराफ व्यावसायिकाला २ लाख रुपये लाच मागितली. ही लाच देण्याची सराफाची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने याची सूचना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला दिली. त्यानंतर पथकाने सापळा रचून परदेशी यांना अटक केली.
असे लाचखोर पोलीस गुन्हेगारांवर वचक निर्माण करू शकतील का ? तसेच अशाने समाजातील गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी न्यून होईल का ? अशा लाचखोर पोलिसांना तात्काळ कठोर शिक्षा व्हावी, असे जनतेला वाटते !
७. मुलाला समज देण्यासाठी घेऊन आलेल्या महिलेसमोर त्याला अश्लील शिव्या देऊन समज देणारे असभ्य पोलीस
काही वर्षांपूर्वी मुंबईतील एका पोलीस ठाण्यामध्ये एक फौजदार होते. एक दिवस ते रात्रपाळीला कर्तव्यावर असतांना भल्या पहाटे एक महिला तिच्या १५ ते १६ वर्षांच्या मुलासमवेत पोलीस ठाण्यामध्ये आली आणि ‘मुलगा पुष्कळ त्रास देतो’, असे सांगू लागली. पोलिसांनी मुलाला थोडा दम भरावा, एवढीच तिची अपेक्षा असावी. साहेबांनी मुलाला समोर उभे केले आणि त्याच्या आईसमोर त्याला एवढ्या घाणेरड्या अन् अश्लील शिव्या दिल्या की, त्या ती महिला ऐकू शकली नाही. ती लगेच ‘मला तक्रार करायची नाही’, असे सांगून मुलाला परत घेऊन गेली. ‘भीक नको; पण कुत्रा आवर !’ या म्हणीप्रमाणे त्या महिलेची अवस्था झाली होती.’
– एक निवृत्त पोलीस अधिकारी (१५.११.२०२०)
(समाप्त)
पोलीस आणि प्रशासन यांच्या संदर्भात येणारे कटू अनुभव कळवा !साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !पोलीस-प्रशासन यांतील कर्मचारी किंवा अधिकारी यांच्याविषयी कटू अनुभव आले असल्यास ते पुढे दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत. या लेखाचे प्रयोजन ‘पोलीस आणि प्रशासन कसे नसावे’ हे ध्यानात यावे, संबंधित कर्मचारी/अधिकारी यांना त्यांच्या अयोग्य कृत्यांची जाणीव होऊन त्यांनी त्यात सुधारणा करावी आणि नागरिकांनी आपले राष्ट्रकर्तव्य म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता ते सुधारण्यास प्रयत्न करावेत, वेळप्रसंगी या विरोधात तक्रारी द्याव्यात, हे आहे. पत्ता : अधिवक्ता नीलेश सांगोलकर द्वारा सनातन आश्रम, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४ ई-मेल : [email protected] |
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी वा अपकीर्ती करण्याचा उद्देश नाही, तर प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा व्हावी’, हा उद्देश आहे. – संपादक