एका सामाजिक संकेतस्थळावर एक संदेश वाचनात आला. त्यात एका पती-पत्नीचा संवाद देण्यात आला होता. ऐतिहासिक मालिका पाहून पत्नी पतीला म्हणते, ‘‘अहो, मला एक दासी हवी आहे.’’ त्यावर पती म्हणतो, ‘‘थोडं थांब. माझा राज्याभिषेक झाला की, तुला ४ आणि मला चार अशा दासी ठेवूया.’’ पत्नी विचारते, ‘‘तुम्हाला कशाला हव्यात ४ दासी ?’’
त्यावर पती म्हणतो, ‘‘वारा घालायला, दोन इकडून आणि दोन तिकडून !’’ पतीच्या अशा बोलण्यावर पत्नी म्हणते, ‘‘असू द्या मग तुमचा राज्याभिषेक !’’ हा संदेश वाचला आणि त्यानंतर त्याच्या खाली पाहिले, तर ५० हून अधिक जणांनी त्याला ‘लाईक’ दिले होते. यावरूनच आजच्या समाजाची हीन स्तराला गेलेली मानसिकता दिसून येते. ऐतिहासिक मालिकांमधील व्यक्तीरेखा या हसण्याच्या योग्यतेच्या निश्चितच नव्हत्या आणि नाहीतही ! प्रत्येक व्यक्तीरेखा किंवा पात्र असो, त्यातून तितकेच शिकण्यासारखे असते. मग ती दासी असो किंवा राजा असो ! इतिहासकाळात राजांच्या दरबारी किंवा महालात दासी असायच्या; पण त्या सेवेकरी म्हणून. त्यांना राजा-राणीप्रती पुष्कळ आदर आणि प्रेम असायचे. वर्षानुवर्षे त्या त्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घ्यायचा. त्या दासींचा त्याग खरेतर शिकण्यासारखा आणि अनुकरणीयही आहे; मात्र वरील संवादात दासींच्या वारा घालण्याच्या सेवेची एक प्रकारे टिंगलटवाळीच केलेली दिसते. खेदाची गोष्ट म्हणजे आजच्या समाजाची मानसिकताच त्यातील योग्य काय हे घेण्याची राहिलेली नाही. समाज दिशाहीन होत असल्यामुळे पराक्रम करणे तर दूरच, उलट अशा विनोदी संवांदांतून केली जाणारे विधाने पहाता ‘या लोकांची हुशारी नक्की आहे तरी कुठे ?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. वरील संवादात दासींच्या अवमानापेक्षाही भयंकर आणि संतापजनक गोष्ट म्हणजे ‘राज्याभिषेक’ या शब्दाचे मूल्य तर शून्यच केले आहे. ‘राज्याभिषेक’ कुणाचा केला जातो ? तर पराक्रम गाजवणार्या शूरवीर राजाचा ! कलियुगातील एखाद्या पतीचा ‘राज्याभिषेक’ होऊ शकतो का ? म्हणजे तो ‘राज्याभिषेका’सारख्या सन्मानाच्या घटनेसाठी पात्र आहे का ? कदापि नाही. कुठला शब्द कुठे वापरावा, हेही आज लोकांना कळत नाही. सामर्थ्यशाली इतिहास घडलेल्या भारतातील या घटना दुर्दैवीच आहेत. लोकहो, ऐतिहासिक मालिका केवळ पाहून सोडून देऊ नका किंवा त्यांतील पात्रांची टर उडवू नका. त्या व्यक्तीरेखांमुळे भारताचा गौरवशाली इतिहास घडला आहे, हे विसरू नका. तो इतिहास आज जरी आपल्यासाठी भूतकाळ असला, तरी त्यातून शिकून वर्तमानात आचरण करा आणि आपला भविष्यकाळ उज्ज्वल असा घडवा !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.