सुनीता विल्यम्स यांच्या निमित्ताने…!

सुनीता विल्यम्स

भारतीय वंशाच्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच २८६ दिवस अक्षरशः अवकाशात अडकले होते. त्यांनी अनंत अडचणींचा सामना केला. बाहेर पडण्याचा कुठलाही मार्ग नाही. ‘कधी घरी परतता येईल का ?’, याचीही शाश्वती नाही. भयावह, धोकादायक, असह्य, तणावपूर्ण, आधारहीन अवस्था ! त्यांनी पृथ्वीला ४ सहस्र ५७६ प्रदक्षिणा घातल्या, म्हणजे १२ कोटींपेक्षा अधिक मैल प्रवास केला; मात्र त्यांनी शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही. अपूर्णतेची तक्रार न करता सुनीता विल्यम्स अंतराळात अडकूनही शांतपणे काम करत राहिल्या. तिथे कसलीही हमी नसतांना मानसिक बळाच्या आधारे या अंतराळविरांनी परिस्थिती स्वीकारून धैर्याने, शांत राहून आणि संयमाने वाट पाहिली. त्यांनी त्यांचा संयम आणि मनोधैर्य ढळू दिले नाही. त्याच वेळी पृथ्वीवरही कितीतरी शास्त्रज्ञ त्यांचे ज्ञान आणि कसब पणाला लावून यान परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना सुटकेचा मार्ग सापडला.

श्रीमती धनश्री देशपांडे

धीरोदात्त व्हा !

समस्त मानवजातीला हा प्रसंग पुष्कळ काही शिकवून जातो. सुनीता विल्यम्स यांच्या निमित्ताने प्रत्येकच मनुष्याने आपले आत्मनिरीक्षण करावे, मनोधैर्य तपासावे. आपण स्वतःच्या समस्यांची कुरकूर करत त्यात अडकून राहिलो आहोत का ? आपल्या पुढ्यात असलेले आयुष्य, निर्माण झालेली परिस्थिती आपल्याला शांतपणे स्वीकारता येते का ? आपण कुठे अडलो आहोत ? आणि का ? याचे चिंतन करायला हवे. आपण १० मिनिटे वाहतूककोंडीत अडकलो तरी स्वतःची चिडचिड होते, ५ मिनिटे वीज गेली, तरी त्रागा होतो. मनाविरुद्ध झाले की, संयम सुटतो. जीवनात नकारात्मक स्थिती निर्माण झाल्यास निराशा येते. ५-१० मिनिटे एखाद्या कामासाठी रांगेत उभे रहावे लागले, तरी अस्वस्थता येते. अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. माझे सुखकारक वातावरण (कम्फर्ट झोन) कसे सुरक्षित राहील ?’, असे प्रत्येक जण पहातो; कारण खरे सांगायचे, तर आपण केवळ आणि केवळ अडकलो आहोत ते आपल्या मनाच्या ४ भिंतीमध्ये ! ती चौकट तोडण्याची आवश्यकता आहे !

सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जातांना आपल्यासोबत श्री गणेशाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या. यातून त्यांची श्री गणेशावरील श्रद्धा अधोरेखित होते. त्या बळावरच २८६ दिवसांचा अनिश्चिततेचा कालावधी त्यांनी यशस्वीपणे पार केला असावा ! जर हे अंतराळवीर ८ दिवसांच्या अंतराळ सफरीवर जाऊन ९ महिने अवकाशात टिकू शकतात, तर आपण आयुष्यातील काही छोटे प्रसंग, विलंब आणि संघर्ष निश्चितच यशस्वीपणे झेलू शकतो ! आपणही अडचणींवर मात करू शकतो ! त्यासाठी काय करावे लागेल ? आपल्या नियोजनानुसार सगळे घडेलच असे नाही; पण संयम ठेवल्यास मार्ग सापडेल. काही वेळा परिस्थिती आपल्या हातात नसते; पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते ! शांत राहून ‘पुढे काय करता येईल ?’, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. अंतिम उद्दिष्ट दृष्टीसमोर ठेवून ‘कठीण परिस्थितीतही मार्ग काढायचाच’, असा दृढ निश्चय करायला हवा. म्हणूनच म्हणतात, ‘प्राप्त परिस्थितीवर मात करणे, हे केवळ श्रद्धा आणि सबुरी यांमुळेच शक्य आहे’ !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.