सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोव्यातील एकही डंपर येऊ देणार नाही ! – सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटना

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपर व्यावसायिकांना गोवा राज्यात विविध प्रकारे नाहक त्रास दिला जात आहे. हा त्रास न थांबल्यास गोवा राज्यातील एकही डंपर जिल्ह्यात येऊ देणार नाही, अशी चेतावणी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेने दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डंपरवर गोवा राज्यात होणार्‍या कारवाईविषयी सावंतवाडी तालुका डंपर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि मळगाव येथील दत्तप्रसाद डंपर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली डंपर व्यावसायिकांची बैठक झाली. जिल्ह्यातील डंपरवर होणारी कारवाई थांबवण्यात यावी, यासाठी येत्या २ दिवसांत प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस संघटनेचे पदाधिकारी, तसेच डंपर व्यावसायिक आदी उपस्थित होते.