या लेखात भूस्खलनाची माहिती देण्यात आली आहे. भूस्खलन सर्वत्र होत नसले, तरी पुढील आत्पकाळात भूकंपाप्रमाणे याचाही धोका डोंगराळ भागामध्ये मोठा परिणाम होऊ शकतो. भूस्खलन होण्याची कारणे, त्याची भीषणता, भूस्खलनाची आपत्ती टाळण्यासाठी योजायचे काही प्रतिबंधात्मक उपाय, भूस्खलन होण्यापूर्वी मिळणार्या काही पूर्वसूचना, ते होत असतांना आणि झाल्यानंतर कोणत्या गोष्टी कराव्यात आदींविषयीची माहिती देण्यात आली आहे.
भाग ८.
भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/458962.html
७. भूस्खलन
७ अ. ‘भूस्खलन’ या शब्दाचा अर्थ : कठीण अथवा ठिसूळ डोंगर किंवा टेकडी यांचा भाग अचानक उताराच्या दिशेने कोसळतो, त्याला ‘भूस्खलन’ असे म्हटले जाते. काही वेळा ही घटना अतिशय जलद होते, तर काही वेळा तिला काही घंटे, दिवस अथवा मासही लागतात. बहुतेक वेळा भूस्खलन होत असतांना दगड-धोंडे, माती, पाणी, चिखल आदींचे मिश्रण अती जलद गतीने खाली येते.
७ आ. भूस्खलन होण्याची कारणे
७ आ १. नैसर्गिक : अतीवृृष्टी, जलद बर्फ वितळणे, भूकंप, वादळ, ज्वालामुखीचा उद्रेक, आग (झाडांच्या घर्षणामुळे किंवा तापमान वाढीमुळे निर्माण झालेली आग) यांसारख्या अनेक कारणांमुळे भूस्खलन होऊ शकते.
७ आ २. मानवनिर्मित
अ. भूभागात मानवाने अती खोदकाम केले, तर भूमीमध्ये हादरे बसून भेगा निर्माण होतात.
आ. बोगदे खणतांना कधी कधी स्फोटकांचाही वापर केला जातो. त्यामुळेही भूमी ठिसूळ होऊ शकते.
इ. बर्याचदा बांधकाम करतांना केलेल्या अमर्याद वृक्षतोडीमुळेही भूस्खलन होऊ शकते.
७ इ. भूस्खलनाच्या आपत्तीची भीषणता : भारतात सर्वाधिक भूस्खलन हिमालयाच्या परिसरातील काश्मीर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांत होते. देशात प्रतिवर्षी भूस्खलनामुळे सरासरी ७०० लोकांचा मृत्यू होतो. अगदी अलीकडचे उदाहरण घ्यायचे, तर ३०.७.२०१४ या दिवशी महाराष्ट्रातील माळीण (तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे) या गावात भूस्खलन झाल्यामुळे ७४ पैकी ४४ घरांसह १५५ हून अधिक व्यक्ती, तसेच अनेक जनावरे इत्यादी काही क्षणांतच मातीच्या ढिगार्याखाली गाडली गेली.
७ ई. भूस्खलनाची आपत्ती टाळण्यासाठी योजायचे काही प्रतिबंधात्मक उपाय
७ ई १. ‘भूस्खलन टाळण्यासाठी ज्या भागात भूस्खलनाची शक्यता आहे किंवा जेथे अशा प्रकारच्या घटना पूर्वी घडल्या आहेत, त्या भागात अधिकाधिक झाडे लावावीत. जेणेकरून त्यांची मुळे भूमीला घट्ट धरून ठेवतील आणि भूस्खलन टळू शकते. विशेष करून डोंगराळ भागात मोठी झाडे, तसेच इतर वनस्पती लावाव्यात.
७ ई २. पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेल्या संरक्षक भिंतीतील भोके स्वच्छ ठेवावीत. तसेच पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्याचा मार्ग पालटू नये. तसे न केल्यास पाण्याला बाहेर पडण्यास वाट न मिळाल्याने त्याच्या दाबामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो.
७ ई ३. उतार, कडे आणि पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग यांवर बांधकाम करू नये. कचरा किंवा सामुग्री साठवून ठेवू नये. असे केल्यास भूस्खलनामुळे ते घसरू शकते आणि अधिक हानी होऊ शकते.
७ ई ४. पावसाळ्यापूर्वी डोंगरांचे उतार, धोकादायक दरडी इत्यादींची पहाणी करावी आणि आवश्यक त्या उपाययोजना करून भूस्खलन होणार नाही, हे पहावे. यासाठी संबंधित भागातील तरुण, ग्रामसेवक आणि अनुभवी शेतकरी यांचे साहाय्य घेता येईल. हे लोक धोकादायक दरडींच्या ठिकाणी लक्ष ठेवून त्यांना कोणतेही धोकादायक पालट लक्षात येताच, ग्रामस्थ आणि संबंधित शासकीय यंत्रणा यांना दक्ष करू शकतात.
७ उ. भूस्खलन होण्यापूर्वी मिळणार्या काही पूर्वसूचना
‘प्रत्येक वेळी भूस्खलनाची पूर्वसूचना मिळतेच, असे नाही. काही वेळा पूर्वसूचना मिळतात; मात्र त्याचा अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे असते. तसे न केल्यास पूर्वसूचना मिळूनही भूस्खलनापूर्वीच्या सिद्धता करता येऊ शकणार नाहीत. काही वेळा आपल्या सभोवताली संथ गतीने पुढीलप्रमाणे होणारे पालट पुढे मोठ्या भूस्खलनाला कारणीभूत ठरतात. अशा नैसर्गिक सूचनांकडे लक्ष द्यावे.
१. अचानक दारे-खिडक्या घट्ट होणे
२. इमारतींचा पाया खचतो. त्यामुळे इमारत काही प्रमाणात भूमीच्या खाली जाते किंवा इमारतींना तडे जातात.
३. भूमीगत वाहिन्या (विद्युत्, जल आदी) अचानक किंवा आपोआप तुटणे
४. खडकांना अथवा भूमीला अचानक तडे जाणे
५. नदीचे पाणी अचानक गढूळ होणे
६. पाऊस पडत असतांना किंवा नुकताच थांबला असतांना नदीचे पाणी अचानक न्यून होणे
७. झाडे, कुंपण, खांब, संरक्षक भिंती आदी अचानक एका मागोमाग झुकणे
८. उतारावरील भूपृष्ठभाग वर येणे (फुगल्यासारखा दिसणे)
९. भूमीवर नवीन झरे फुटणे’
(संदर्भ : pocketbook-do-dont-1.pdf, pg76 आणि usgs.gov/natural-hazards/landslide-hazards/science/landslide-preparedness)
७ ऊ. भूस्खलन होत असतांना हे करा !
७ ऊ १. ‘भूस्खलनाच्या वेळी आपल्या दिशेने ढिगारा येत असेल, तर रस्ता, पूल पार करणे टाळावे, तसेच शक्य तेवढ्या लवकर ढिगार्याच्या मार्गापासून दूर उंच भागात जाण्याचा प्रयत्न करावा. भूस्खलन होत असतांना ढिगारा सखल भागात गोळा होत असल्याने तेथे, तसेच नदीपात्राजवळ जाणे टाळावे.
७ ऊ २. अचानक झाडे मोडण्याचा, तसेच दगड घरंगळण्याचा ध्वनी आल्यास त्वरित उतार अथवा सखल भागापासून दूर जावे.
७ ऊ ३. भूस्खलनाच्या वेळी आपण त्या भागातून निसटू शकत नसू किंवा ‘ढिगार्याखाली गाडले जाऊ’, असे वाटत असेल, तर मोठे पटल किंवा त्यासारख्या जड वस्तूच्या खाली लपा. डोक्याचे रक्षण करण्यासाठी उशीचा वापर करू शकता. खिडकी आणि दरवाजे यांच्याजवळ उभे रहाणे टाळा.’
७ ए. भूस्खलनानंतर हे करा !
७ ए १. ‘सैल माती किंवा वस्तू यांना स्पर्श करू नये किंवा त्यावरून चालू नये. भूस्खलनामुळे अशी माती दाब पडल्यावर लगेच घसरू शकते आणि जीवितहानी होऊ शकते.
७ ए २. विजेचा धक्का लागण्याच्या शक्यतेमुळे विद्युत् तारा किंवा खांब यांपासून दूर रहावे. शक्य असल्यास संबंधित (विद्युत्, जल आदी) खात्यांना संपर्क करून भूस्खलनाची कल्पना द्यावी. त्यामुळे विद्युत, जल आदी प्रवाह बंद होऊन पुढील हानी टळेल.
७ ए ३. उतार अथवा सखल भागापासून दूर जावे.
७ ए ४. भूस्खलनामुळे नद्या, झरे, विहिरी इत्यादींचे पाणी दूषित झाले असण्याची दाट शक्यता असल्याने तेथील पाण्याचे निर्जंतुकीकरण केल्याविना पाणी पिऊ नये.
७ ए ५. भूस्खलन झालेल्या क्षेत्रापासून दूर रहा. तेथे लागोपाठ भूस्खलन होण्याची किंवा पूर येण्याची शक्यता असते. तज्ञांनी सुरक्षिततेची पुष्टी देईपर्यंत भूस्खलन झालेल्या स्थानापासून दूर रहावे.
७ ए ६. पावसाळ्यात भूस्खलन झालेल्या भागांत पूर येण्याची शक्यता असल्याने तेथे शक्य तेवढ्या लवकर भराव घालून भूमी पूर्ववत् करावी आणि झाडे लावावीत.’
(क्रमशः पुढील मंगळवारी)
(संदर्भ : pocketbook-do-dont-1.pdf, pg77 & 78)
भाग ९. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/463913.html