सतत आनंदी असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या कै. (सौ.) श्रुतिका दिलीप मोरवाले !

सतत आनंदी असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या पुणे येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) श्रुतिका दिलीप मोरवाले (वय ६२ वर्षे) !

‘पुणे येथील साधिका सौ. श्रुतिका दिलीप मोरवाले यांचे २०.६.२०२० या दिवशी आजारपणामुळे देहावसान झाले. सौ. मोरवालेकाकू यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांचे नातेवाइक अन् साधिका यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. श्रुतिका मोरवाले

१. साधनेमुळे सहनशीलता वाढणे

‘आरंभी श्रुतिकाताईला इंजेक्शन घेण्याची भीती वाटत असे. तिची सहनशीलता अत्यल्प होती; परंतु साधनेला आरंभ केल्यानंतर तिचा शारीरिक त्रासाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटला. ती तिला होणार्‍या शारीरिक त्रासांविषयी कधीच गार्‍हाणे करत नसे. तेव्हा ‘साधनेमुळे तिची सहनशीलता वाढली आहे’, असे लक्षात आले.

२. प्रेमभाव

अ. आमचा मुलगा पुढील शिक्षणासाठी पुण्याला जाणार होता. तेव्हा बहिणीने त्याला तिच्या घरी रहाण्यास सांगितले. आम्हा सर्व भावंडांविषयी तिच्या मनात जिव्हाळा होता. ती नेहमी सर्वांची प्रेमाने विचारपूस करत असे. कधी कुणाचे वाद झाल्यास ती सर्वांमध्ये मेळ जमवून आणत असे.

आ. ती आश्रमात खाऊ किंवा भोजन अत्यंत प्रेमाने देत असे.

३. निष्ठा

पहिल्यापासून तिची धार्मिक कृतींवर श्रद्धा होती. ती तिला साधनेतही उपयोगी ठरली. सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर तिने गुरु म्हणून परात्पर गुरुदेवांशी एकनिष्ठ राहून श्रद्धेने साधना केली.

४. जुळवून घेणे

माझ्या माहेरी आईव्यतिरिक्त सर्व जण मांसाहार करणारे होते; परंतु बहीण शाकाहारी होती. तिने हे व्रत सासरीही तंतोतंत पाळले; परंतु त्यासाठी तिने सासरच्या माणसांना तिच्या या सवयीची अडचण होऊ दिली नाही.’

– सौ. माधुरी जठार (कै. श्रुतिका मोरवाले यांची बहीण) आणि श्री. अनिल जठार (मेव्हणे), पुणे

५. हसतमुख आणि आनंदी

‘सौ. मोरवालेकाकूंना कधीही भेटलो, तरी त्यांच्या मुखावर हसू असायचे. त्या सतत आनंदी दिसायच्या. त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही तो त्यांच्या तोंडवळ्यावरून जाणवत नसे. त्या आलेल्या कठीण प्रसंगांना धिराने सामोरे गेल्या.’

– सौ. ज्योती दाते आणि श्रीमती अरुणा मोहिते, पुणे

६. शांत आणि मनमिळाऊ

‘काकू शांत आणि मनमिळाऊ होत्या. त्या माझी आध्यात्मिक मैत्रीणही होत्या. सतत उत्साही, सर्वांशी प्रेमाने वागणे-बोलणे, टापटीप रहाणे, हे गुण मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले. काही वर्षांपासून त्या घरी राहून सेवा करत होत्या. त्या कोणत्याही सेवेसाठी तत्पर असायच्या. मी त्यांना राग आल्याचे कधीच पाहिले नाही. त्यांच्याकडे पाहिले, तरी मला उत्साह येत असे. त्यांना साधकांचे संपर्क क्रमांकही पाठ असायचे.

७. श्रद्धा

त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा होती. ‘परात्पर गुरुदेव हे श्रीकृष्णच आहेत’, असे त्या सतत म्हणायच्या.’  – श्रीमती अरुणा मोहिते

८. स्थिरता

‘सौ. मोरवालेकाकू घरी राहूनही भावपूर्णपणे सेवा करत. त्यांची वृत्ती आधीपासूनच पुष्कळ शांत आणि स्थिर होती. काकूंच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर आणि नंतर आजारपणातही त्या पुष्कळ स्थिर आणि शांत दिसत होत्या.

९. सतत अनुसंधानात असणे

‘त्यांचे मन कशात अडकले आहे’, असे कधीच जाणवले नाही. ‘त्या सतत अनुसंधानात आहेत’, असेच त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटायचे. तीव्र आजारपणातही त्यांनी परिस्थितीविषयी कधी गार्‍हाणे केले नाही. त्यांनी सर्वकाही स्थिर राहून स्वीकारले. परिस्थिती १०० टक्के स्वीकारल्यामुळे साधनेत किती स्थिरता येऊ शकते, हे काकूंच्या उदाहरणावरून मला शिकता आले. गुरुदेवांच्या कृपेने असे साधक आम्हाला लाभले आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. मनीषा पाठक, पुणे (२५.६.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक