सचिन वाझे यांच्या अटकेचा सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम नाही ! – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

डावीकडून शरद पवार, सचिन वझे

देहली – सध्याची सर्व परिस्थिती गृहविभागाने चांगल्या प्रकारे सांभाळली. जे चुकीचे काम किंवा पदाचा दुरुपयोग करत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. सचिन वाझे यांचे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू आहे. त्यासाठी सहकार्य करू. सचिन वाझे यांच्या अटकेचा सरकारच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी १६ मार्च या दिवशी देहली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

या वेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून हटवण्याच्या संकेताचे वृत्त शरद पवार यांनी फेटाळले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना पदावरून हटवण्याविषयी पत्रकारांनी विचारले असता त्यामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत राज्यातील घडामोडी, तसेच केंद्रात काही गोष्टींविषयी सहकार्य मिळावे, याविषयी चर्चा झाल्याचे त्यांनी म्हटले.