सनातन संस्थेला सद्गुरु देवेंद्रनाथ यांचे आशीर्वाद मिळवून देणारे पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

पू. (प्रा.) अशोक नेवासकर

पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांची अध्यात्म आणि विज्ञान यांची चांगली बैठक होती. खरेतर ते व्यवहारातील खूप मोठे व्यक्तित्त्व होते; परंतु त्यांना ज्ञानाचा कुठलाच अहं नव्हता. ते मला नेहमी भ्रमणभाष करायचे आणि सांगायचे, ‘मला गुरुदेवांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) आठवण येते, तसेच मला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे पूर्णवेळ कार्य करायचे आहे. मला माझ्याकडे असलेले ज्ञान सनातन संस्थेला द्यायचे आहे.’ कोणतेही यज्ञयाग करण्यापूर्वी ते आम्हाला ‘तुम्ही यज्ञापूर्वी मानसरित्या गायत्रीदेवीला प्रार्थना करा’, असा उपदेशही करायचे. त्यांचा आम्हाला खूप आधार होता. ते गेल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. आता आम्हाला पुढे कोण मार्गदर्शन करणार, असे क्षणिक वाटले; पण नंतर जाणवले की, त्यांना प्रार्थना केली की, ते सूक्ष्मातून प्रेरणा आणि शक्ती देतील.

पू. नेवासकर यांनी सपत्नीक त्यांचे गुरु देवेंद्रनाथ यांची सगुण सेवा केली. त्यांनी गुरु-शिष्य नात्याविषयी विपुल लिखाण केले आहे. या लिखाणाच्या माध्यमातून ‘गुरु कसे असतात आणि ते तत्त्व म्हणून कसे कार्य करतात’, हे त्यांच्या लिखाणातून सुस्पष्टपणे कळते. ते अध्यात्मातील विविध ज्ञानाविषयीचे पैलू सहजपणे उलगडून सांगत. उदा. गुरुज्योती, आत्मज्योती अशा अनेक गोष्टींचे अर्थ ते लीलया उलगडून सांगायचे आणि त्यासह स्वानुभवही सांगायचे.

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

सनातन संस्थेसाठी प्रार्थना आणि अनुष्ठाने करणे

पू. (प्रा.) अशोक नेवासकर प्रतिदिन सनातन संस्था आणि हिंदु राष्ट्र स्थापनेमधील सूक्ष्मातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे, परात्पर गुरुदेवांना दीर्घायुष्य मिळावे, म्हणून प्रार्थना करायचे, तसेच प्रत्येक अमावास्येला सनातनसाठी मानस अनुष्ठान करायचे. ते नेहमी सांगत की, सनातन संस्थेला सद्गुरु देवेेंद्रनाथ यांनी रक्षाकंकण (कवच) घातले आहे. तशी मी आमच्या सद्गुरूंना प्रार्थनाही केली आहे.

गेली अनेक वर्षे यातून पू. नेवासकरकाकांच्या माध्यमातून सनातन संस्थेचे नाथच रक्षण करत आहेत.

आगामी काळाविषयी केलेले भाष्य

पू. नेवासकरकाका यांना त्यांचे सद्गुरु देवेंद्रनाथ सूक्ष्मातून आदेश देत. अशाच एका आदेशात सद्गुरु देवेंद्रनाथ यांनी आगामी काळाविषयी सांगितले होते, ‘येणारा काळ पुष्कळ कठीण आहे. या काळात केवळ भक्तच वाचतील आणि त्यामुळे साधकांनी साधना वाढवायला हवी.’

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणे

मध्यंतरी माझे आणि पू. नेवासकरकाकांशी बोलणे झाले. त्या वेळी मी त्यांना सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून माझ्या शरिरात पुष्कळ उष्णता जाणवते आहे. त्या वेळी त्यांनी मला सांगितले, ‘ही देवासुर युद्धातील उष्णता आहे. सूक्ष्मातून चालू असलेल्या युद्धाची उष्णता पुष्कळ असते. ती सहन करण्याची शक्ती गुरुच देतात.’

पू. नेवासकरकाका आणि नेवासकरकाकू यांचे आध्यात्मिक स्तरावर असलेले पती-पत्नीचे नाते

पू. नेवासकरकाका आणि त्यांच्या पत्नी हेमलता यांचे एकमेकांतील नाते हे आध्यात्मिक स्तरावरचे आहे. काकूंनी पू. काकांना आयुष्यभर साधनेत साथ दिली. तसेच काकूंनी सद्गुरु देवेंद्रनाथ यांची सगुण सेवा केली आहे. त्यामुळे त्यांचीही आध्यात्मिक बैठक चांगली आहे.

पू. नेवासकरकाकांनी देहत्याग केल्याचे मला कळल्यावर मी काकूंशी बोलले, त्या वेळी त्या खूप स्थिर होत्या. तसेच या बोलण्यामध्ये काकूंनी सांगितले, ‘मला गेल्या २ दिवसांपासून जाणवत होते की, ह्यांचे (पू. नेवासकरकाका) काही खरे नाही.’ (ही काकूंना मिळालेली पूर्वसूचना होती. – संकलक)

पू. नेवासकरकाकांच्या माध्यमातून सनातन संस्थेला नाथ संप्रदायाचे आशीर्वाद मिळाले. त्यांच्या आशीर्वादामुळेच सनातनचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे आणि असेच त्यांचे अखंड आशीर्वाद आमच्या पाठीशी राहोत, ही पू. काकांच्या चरणी प्रार्थना ! त्यामुळे गुरु देवेंद्रनाथ, पू. नेवासकरकाका, आणि नाथ संपद्राय यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !

– (श्रीचित्‌शक्‍ति) सौ. अंजली गाडगीळ

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक