विविध विकारांवर उपचार करणार्‍या संगीतातील रागांचा ते विकार असणार्‍या आणि आध्यात्मिक त्रास असणार्‍या व्यक्तींवर होणारा परिणाम अभ्यासण्याचा प्रयोग

नृत्य आणि संगीत यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

संगीत आणि नृत्य यांवरील प्रयोगांच्या सूक्ष्माच्या संदर्भातील वार्ता (सूक्ष्म-वार्ता) !

या जगामध्ये काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. ‘ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, त्या अस्तित्वात नसतात’, असा अर्थ होत नाही, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे ‘तो नाही’, असे नाही. साधनेमुळे जिवाची सात्त्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील ‘सूक्ष्मातील’ कळू लागते आणि एखाद्या गोष्टीतील चांगली अन् त्रासदायक स्पंदने जाणवू लागतात. सध्या समाज सात्त्विकतेपासून दूर चालला आहे आणि रज-तमात्मक चालीरिती समाजात दृढ होत आहेत. संगीत आणि नृत्य हे क्षेत्रही याला अपवाद नाही. हे समाजाला दाखवून देण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आम्ही संगीत आणि नृत्य यांवर संशोधनात्मक प्रयोग केले. जे आम्हाला सूक्ष्मातून जाणवले, ते समाजाला सांगण्यासाठी आणि ‘योग्य काय असायला हवे ?’ ते त्याला समजण्यासाठी, ते वैज्ञानिक उपकरणांद्वारेही सिद्ध करून दाखवले आहे. येथे केवळ ‘अयोग्य गोष्टींचा कसा परिणाम होतो ?’, हे दाखवून देणार्‍या, म्हणजेच सूक्ष्माच्या संदर्भातील काही वार्ता (सूक्ष्म-वार्ता) देत आहोत.

‘१.१०.२०१७ या दिवशी संगीतातील विविध रागांचा व्यक्तीवर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये विविध विकारांवर उपचार करणारे राग ते ते विकार असणारे साधक आणि तीव्र त्रास असलेले साधक यांना ऐकवण्यात आले. त्या वेळी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहोत.

१. राग – मधुवंती  : सोरायसिस

१ अ. ‘सोरायसिस’ हा त्वचाविकार असलेल्या २ साधकांना आलेल्या अनुभूती

१. दोन्ही साधकांना शरीर हलके झाल्याचे जाणवले आणि गारवा जाणवला. तसेच ‘स्वतःच्या सप्तचक्रांची जागृती होत आहे’, असेही त्यांना जाणवले; मात्र त्यांना विशुद्धचक्राच्या ठिकाणी त्रास जाणवला.

१ आ. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेले १० साधक

१ आ १. रागाची स्पंदने जाणवणे

१ आ १ अ. प्रयोगातील पाच साधकांना तोंडात गोड चव जाणवणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार मधुवंती रागाच्या नावाप्रमाणे त्या रागात माधुर्य आहे. त्यामुळे ‘ऐकवलेला राग कोणता आहे’, हे ठाऊक नसतांनाही प्रयोगात सहभागी झालेल्या १० पैकी ५ साधकांना तोंडात गोड चव जाणवली.

१ आ १ आ. दोन साधिकांना संपूर्ण शरिरावर किंवा कुंडलिनीचक्रांवर चांगल्या संवेदना जाणवणे : एका साधिकेला संपूर्ण शरिरावर आणि दुसर्‍या साधिकेला स्वाधिष्ठानचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत चांगल्या संवेदना जाणवल्या.

१ आ १ इ. एका साधकाला ‘हा राग आपतत्त्वाशी संबंधित आहे’, असे जाणवले.

१ आ २. त्रासदायक अनुभूती येणे

१ आ २ अ. एका साधिकेला अनाहतचक्रापासून विशुद्धचक्रापर्यंत दाब जाणवला.

२. राग – वृंदावनी सारंग  : पित्ताचा विकार

२ अ. पित्ताचा विकार असलेल्या २ साधकांना आलेल्या अनुभूती

२ अ १. एका साधकाला अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवून त्याच्याकडून हाताच्या बोटांच्या मुद्रा आपोआप होणे : यांतील एका साधकाला अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. त्याच्याकडून हाताचे मधले बोट आणि अंगठा जोडून सिद्ध होणारी मुद्रा आपोआप झाली आणि काही वेळाने त्याची अनामिका तळव्याला आपोआप टेकली गेली.

२ अ २. दुसर्‍या साधिकेला काही जाणवले नाही.

२ आ. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेले ११ साधक

२ आ १.रागाची स्पंदने जाणवणे

२ आ १ अ. अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र या ठिकाणी किंवा केवळ मणिपूरचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवणे : दोन साधिकांना प्रथम अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या आणि त्यानंतर मणिपूरचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या. आणखी ३ साधकांना केवळ मणिपूरचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या.

२ आ १ आ. शरिरात थंडावा जाणवणे : एका साधिकेला शरिराच्या डाव्या बाजूला थंडावा जाणवला, तर अन्य ४ साधकांना संपूर्ण शरिरात थंडावा जाणवला.

२ आ २. ‘हा राग कुठल्या विकारावर उपचार करतो ?’, हे ठाऊक नसूनही ते आतून कळणे किंवा तसे उपचार होणे

अ. एका साधिकेचे सकाळपासून वाढलेले पित्त हा राग ऐकल्यानंतर शमले.

आ. ‘हा राग पित्ताच्या विकारावर उपचार करतो’, हे २ साधिकांना ठाऊक नसतांनाही त्यांनी त्याविषयी सांगितले.

२ आ ३. राग ऐकल्यामुळे चैतन्य मिळाल्याने अनिष्ट शक्तीने त्रास देणे : एका साधिकेला पुष्कळ मळमळल्यासारखे झाले आणि तिच्या दोन्ही डोळ्यांतून पाणी आले.

३. राग – मिया मल्हार : दमा

३ अ. दमा असलेल्या २ साधकांना आलेल्या अनुभूती

३ अ १. ‘मिया मल्हार’ हा राग ऐकल्याने एका साधिकेला श्‍वास घेतांना दम लागायचे थांबून तिचा श्‍वास मोकळा होणे, राग ऐकतांना तिचा नामजप एका लयीत होणे आणि नंतर तिचे ध्यान लागणे : दम्याचा त्रास असलेल्या साधिकेला हा राग ऐकण्यापूर्वी श्‍वास घेतांना दम लागत होता. राग ऐकतांना तिचा नामजप एका लयीत होत होता. नंतर तिचे ध्यान लागल्याने ‘तो राग कधी संपला’, हे तिला कळले नाही. राग ऐकून झाल्यावर तिचा श्‍वास मोकळा झाला होता.

३ अ २. या रागाचा दुसर्‍या साधकावर काही परिणाम झाला नाही.

३ आ. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेले ११ साधक

३ आ १. रागाची स्पंदने जाणवणे किंवा तो राग ओळखता येणे

अ. अकरापैकी चार साधकांना अनाहतचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना, तर एका साधिकेला वेदना जाणवल्या. एका साधिकेला विशुद्धचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या. पाच जणांना कोणत्याही चक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या नाहीत.

आ. एका साधिकेचे ओठ बंद होते, तरीही तिला तिचे ओठ ओलसर वाटत होते.

इ. सर्व साधकांना राग ऐकतांना पुष्कळ गारवा आणि आनंद जाणवला.

ई. एका साधकाला या रागाविषयी काहीही ठाऊक नसतांना, तसेच त्याने तो कधीही ऐकला नसतांना तो ‘मल्हार राग’ असल्याचे ओळखले.

३ आ २. रागाच्या संदर्भात अनुभूती येणे

३ आ २ अ. त्रासदायक अनुभूती

१. एका साधिकेला अनाहतचक्राच्या ठिकाणी वेदना जाणवल्या.

३ आ २ आ. चांगल्या अनुभूती

१. एका साधिकेला प्रयोगात सहभागी झालेली आणि दम्याचा त्रास असलेली एक साधिका संगीत शिकली असून ‘ती गात आहे’, असे दिसले.

२. एका साधिकेला ‘आपण आकाशात पुष्कळ वर गेलो आहोत’, असे दिसले. त्या वेळी तिचा नामजप एका लयीत होत होता.

३ आ ३. राग ऐकल्यामुळे उपचार होणे : हा राग ऐकतांना अकरापैकी तीन साधिकांचा श्‍वास मोकळा झाला. त्यांचे दीर्घ श्‍वसन चालू होते, तसेच मध्ये मध्ये श्‍वासाकडे लक्ष जात होते.

४. राग – मारू बिहाग  : पाठदुखी

४ अ. पाठदुखीचा त्रास असलेल्या २ साधिकांना आलेल्या अनुभूती

४ अ १. रागाच्या आरंभी एका साधिकेच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी होत असलेल्या वेदना थांबणे आणि दोन्ही हातांतून चांगली शक्ती मिळत असल्याचे जाणवणे : राग ऐकतांना आरंभी एका साधिकेच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी दुखत होते. नंतर तिच्या मनाची एकाग्रता होऊन तिला अनाहतचक्राच्या ठिकाणी गोलाकार संवेदना जाणवू लागल्या आणि त्यानंतर तिचे दुखणे थांबले. या प्रयोगाच्या वेळी तिला तिच्या दोन्ही हातांत संवेदना जाणवल्या आणि ‘आपल्या हातांमधून चांगली शक्ती मिळत आहे’, असेही जाणवले.

४ अ २. राग ऐकतांना आरंभी एका साधिकेची पाठ दुखू लागणे आणि काही वेळ राग ऐकल्यानंतर ती थांबणे, तसेच तिच्या मनातील विचार न्यून होऊन मन शांत होणे अन् तिचे ध्यान लागणे : दुसर्‍या साधिकेची राग ऐकतांना आरंभी पाठ तीव्रतेने दुखू लागली; मात्र काही वेळ राग ऐकल्यानंतर तिची पाठदुखी पूर्णपणे थांबली. राग ऐकतांना तिच्या मनातील विचार न्यून होऊन मन शांतही झाले आणि तिचे ध्यान लागले.

४ आ. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेले ११ साधक

४ अ १. रागाची स्पंदने जाणवणे

अ. अकरापैकी तीन साधिकांना अनाहतचक्राच्या ठिकाणी, तर एका साधिकेला मणिपूरचक्राच्या ठिकाणी चांगल्या संवेदना जाणवल्या.

आ. राग ऐकतांना एका साधिकेच्या तोंडात बराच वेळ लाळ येत होती.

इ. दोन साधिकांना पाठीच्या संपूर्ण कण्यामध्ये चांगल्या संवेदना जाणवत होत्या.

४ अ २. राग ऐकल्यामुळे नामजपादी उपाय झाल्याने अनिष्ट शक्तीने त्रास देणे : दोन साधिकांची पाठ दुखू लागली.

५. राग – दरबारी कानडा  : अर्धशिशी

५ अ. अर्धशिशीचा त्रास असलेल्या २ साधिकांना आलेल्या अनुभूती

५ अ १. त्रास वाढणे : अर्धशिशीचा त्रास असलेल्या एका साधिकेचे प्रयोग आरंभ होण्यापूर्वी अल्प प्रमाणात दुखत असलेले डोके राग ऐकू लागल्यावर अधिक प्रमाणात दुखू लागले आणि ते राग संपेपर्यंत थांबलेच नाही. प्रयोग थांबल्यानंतर १ घंट्याने तिचे डोके दुखायचे थांबले. (येथे त्या रागाचा परिणाम उपायात्मक झाल्याने तो रोग वाढून त्यानंतर त्याचे प्रमाण न्यून होत गेले. – संकलक)

५ अ २. चांगले वाटणे : दुसर्‍या साधिकेला हा राग ऐकतांना आज्ञाचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या आणि चांगले वाटले.

५ आ. अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्या ११ साधकांना आलेल्या अनुभूती

५ आ १. रागाची स्पंदने जाणवणे

अ. अकरापैकी पाच साधकांना प्रथम आज्ञाचक्राच्या ठिकाणी आणि नंतर संपूर्ण डोक्यात चांगल्या संवेदना, तर एका साधकाला अनाहतचक्राच्या ठिकाणी संवेदना जाणवल्या.

६. राग – बागेश्री  : उच्च रक्तदाब

६ अ. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या २ साधकांना आलेल्या अनुभूती

६ अ १. दोन्ही साधकांवर उपचार होऊन त्यांचा रक्तदाब सर्वसामान्य स्थितीला येणे : हा राग ऐकण्यापूर्वी प्रयोगातील दोन्ही साधकांचा रक्तदाब उच्च होता. राग ऐकल्यानंतर त्यांचा रक्तदाब सर्वसामान्य स्थितीला आला. यापैकी एका साधकाचा रक्तदाब बरेच दिवस न्यून होत नव्हता. हा राग १ घंटा ऐकल्यावर त्याचा रक्तदाब मोजल्यावर तो न्यून झाल्याचे निदर्शनास आले.

– कु. तेजल पात्रीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३.१०.२०१७)

साधकांना प्रत्येक रागाच्या संदर्भात ज्या चांगल्या अनुभूती आल्या आहेत, त्या बहुतांशी त्या विकारांशी संबंधित कुंडलिनीचक्रांच्या संदर्भातील अनुभूती आहेत. त्यावरून त्या त्या कुंडलिनीचक्रावर उपाय झाल्यामुळे त्या त्या विकारावर त्या त्या रागाचा परिणाम होत असल्याचे लक्षात येते. त्यामुळे काही रागांच्या संदर्भात प्रत्यक्षात विकारावर उपचार झाल्याचे निदर्शनास आले नाही, तरी त्या रागांचा कुंडलिनीचक्रांवर उपाय होणे, म्हणजे त्या विकारांवर अप्रत्यक्ष उपचार होणे होय.

– महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे मूलभूत आध्यात्मिक संशोधन

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक