पुणे कॉसमॉस बँक सायबर आक्रमणातील आरोपी सुमेर शेख याला दुबईमध्ये अटक !

गुन्हेगारीत आघाडीवर असलेले धर्मांध !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे, ७ मार्च – येथील कॉसमॉस बँक सायबर आक्रमणातील प्रमुख आरोपींपैकी २८ वर्षीय सुमेर शेख हा एक आहे. इंटरपोलच्या माध्यमातून त्याच्याविषयी रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. त्यामुळे २८ देशांच्या पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. अन्वेषण करतांना अनुमाने ९४ कोटी रुपये लुटणार्‍या तिघा प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी सुमेर शेख याला यूएईमध्ये अटक करण्यात आली आहे.  आरोपी सुमेर शेख हा सध्या दुबईत रहातो.

या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने आतापर्यंत १२ ते १३ आरोपींना अटक केली आहे. कॉसमॉस बँकेवर सायबर आक्रमण करण्यामागे आरोपी सुमेर शेख याची महत्त्वाची भूमिका आहे. त्यानेच या आक्रमणाचे पूर्णपणे नियोजन करून त्याची प्रत्यक्ष कार्यवाही केली असल्याची दाट शक्यता आहे. आरोपी सुमेर शेखच्या अटकेमुळे कॉसमॉस सायबर आक्रमणाच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोचण्यास पुणे पोलिसांना साहाय्य होणार आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून यूएई पोलिसांकडे पाठपुरावा केला जात आहे. सायबर गुन्हेगारांनी ११ आणि १३ ऑगस्ट २०१८ या कालावधीत पुण्यातील कॉसमॉस बँकेच्या ए.टी.एम्. स्वीचवर सायबर आक्रमण केले होते. बनावट ए.टी.एम्. कार्डद्वारे ९४ कोटी ४२ लाख रुपये इतकी रक्कम काढून घेतल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण ?

सायबर गुन्हेगारांनी डार्क वेबवरून कॉसमॉस बँकेच्या ग्राहकांची गोपनीय इलेक्ट्रॉनिक माहिती चोरली होती. या माहितीचा वापर करून खोटे ए.टी.एम्. कार्ड बनवले. हे कार्ड वापरात आणण्यासाठी आधी बँकेचा ए.टी.एम्. स्वीच सर्व्हर हॅक करण्यात आला होता. सायबर आक्रमण केल्यानंतर तो पैसा घेण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी देश-परदेशात टोळ्या सिद्ध केल्या. त्या माध्यमातून पैसे काढून घेतले, तर हाँगकाँगच्या हेनसेंग बँकेमध्ये आरोपींनी ११ ते १२ कोटी रुपये पाठवले होते. त्यापैकी ६ कोटी रुपये परत मिळवण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.