व्यवस्थेतील त्रुटी !

गाड्यांच्या सुट्या भागांचा व्यापार करणारे व्यापारी मनसुख हिरेन यांचे अचानक जाणे सर्वांनाच संशयास्पद वाटत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या भव्य निवासस्थानाच्या बाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पियो गाडी हिरेन यांच्या मालकीची होती. ही गाडी चोरीला गेल्याची तक्रार हिरेन यांनी पोलीस ठाण्यात केली होती. या प्रकरणात त्यांची पोलिसांकडून चौकशी चालू होती. जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘हिरेन यांना सुरक्षा पुरवली पाहिजे’, असा विषय मांडत होते, त्याच्या काही वेळापूर्वीच त्यांचा मृतदेह रेतीबंदर येथील खाडीत सापडला. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे आणि मृतदेहावर कोणत्याही जखमा नाहीत, एवढीच माहिती कळली. ‘हिरेन हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू होणे संभव नाही’, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. ‘त्यांनी आत्महत्या केली’, असे म्हणावे, तर त्यांची पत्नी, अन्य कुटुंबीय आणि सहकारी यांनी ‘त्यांची मानसिक स्थिती चांगली होती’, असे सांगितले आहे. मृतदेहाच्या तोंडवळ्यावर पुष्कळ रूमाल आढळले आहेत, अशा बातम्या आता येत आहेत. त्यामुळे यामागे घातपात असल्याचे बोलले जाते, तसेच संशयाचे दाट सावट त्यांच्या मृत्यूभोवती आहे.

एखाद्या व्यक्तीसाठी सुरक्षेची मागणी राज्याच्या विरोधी पक्षाने करावी आणि त्या व्यक्तीचा मृतदेहच त्वरित प्रसारमाध्यमांद्वारे लोकांपुढे यावा, ही घटना धक्कादायक आहे, तसेच भय उत्पन्न करणारी आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या प्रकरणाच्या अनुषंगाने बहुमूल्य माहिती दिली. ज्यामध्ये एकाच पोलीस अधिकार्‍यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये योगायोग म्हणू शकतो, अशा अनेक गोष्टी त्यांनी सदनात मांडल्या. जी माहिती एका लोकप्रतिनिधीला मिळते आणि त्याविषयी ते विश्‍लेषण करतात, तीच माहिती घेणे अन् तिचा अभ्यास पोलीस निश्‍चितच करू शकले असते.

त्रुटी केव्हा सुधारणार ?

मुंबईत बर्‍याच वर्षांनी स्फोटके सापडली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण त्वरित पूर्ण होऊन सत्य माहिती लोकांपुढे येणे आवश्यक आहे. या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेद्वारे (एन्.आय.ए.) करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली, त्याविषयी सत्ताधारी पक्षाने आतंकवादविरोधी पथकाकडे अन्वेषण सोपवले आहे. स्फोटके भरलेली गाडी सापडल्यानंतर त्या घटनेचे अन्वेषण मुंबई पोलीस, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र पोलीस इत्यादी विविध यंत्रणा करत आहेत. या अन्वेषणातील काही भागाच्या अन्वेषणासाठी एन्.आय.ए.चे पथक राज्यात येऊनही गेले आहे. आता पुन्हा नवीन यंत्रणा अन्वेषण चालू करणार, तिचे अहवाल येणार, त्यांचा अभ्यास हा पुन्हा लांबचा प्रवास आहे. त्यामुळे जनता तोपर्यंत तणावाखालीच रहाणार. अशा घटनांमध्ये त्वरित अन्वेषण करून जनतेच्या मनातील संशय आणि भय दूर करणे अपेक्षित आहे. जे दुर्दैवाने होत नाही. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी किंवा चर्चासत्रात या विषयातील तज्ञ मंडळी येऊन त्यांचे तर्क मांडतात आणि तो विषय चर्चेपुरता मर्यादित रहातो. जनतेने अशा प्रसंगात काय केले पाहिजे, काय करू नये हे पोलीस आणि प्रशासन यांनी सांगितले पाहिजे. गोपनीय माहिती वगळता प्रतिदिनच्या तपासातील प्रगती जनतेपुढे मांडली पाहिजे, तरच जनतेचा कायदा आणि सुव्यवस्था यांवरील विश्‍वास टिकून राहील. व्यवस्थेतील या त्रुटी दूर करणे हेसुद्धा चांगल्या प्रशासनाचे लक्षण आहे.