|
पणजी, ३ मार्च (वार्ता.) – तम्नार ४०० केव्ही उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात ‘गोवा फॉऊंडेशन’ ही पर्यावरणप्रेमी संघटना आणि प्रकल्पाची झळ पोचणारे भूमीचे ५ मालक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठांत २ निरनिराळ्या जनहित याचिका (पी.आय.एल्.) प्रविष्ट केल्या आहेत. गोवा खंडपिठाने या याचिकांवर ३ मार्च या दिवशी होणार असलेली सुनावणी ६ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे.
तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाला केंद्रीय वीज प्राधिकरणाने २८ नोव्हेंबर २०१८ या दिवशी संमती दिली होती. याचिकादारांनी प्राधिकरणाच्या या निर्णयाला गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे. गोवा खंडपिठाने या प्रकरणी केंद्रशासन, गोवा शासन आणि ‘तम्नार टाईम्’ यांना त्यांचा आक्षेप मांडायला २२ मार्च २०२१ पर्यंत मुदत दिली आहे. याचिकादारांच्या मते या प्रकल्पाचा वन, वन्यजीव, पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले १ लक्ष ३१ सहस्र ८२ वृक्ष यांच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. पश्चिम घाटातील वन, वन्यजीव आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेला भाग यांचे संरक्षण झाले पाहिजे. याचिकादारांनी या प्रकरणी प्रकल्पाच्या बांधकामावर स्थगिती आणून ते काम ‘आहे त्याच स्थितीत’ ठेवण्याचा अंतरिम आदेश द्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे, तसेच शासनाला खासगी भूमीतील २२ सहस्र वृक्षांपैकी एकही वृक्ष तोडायला देऊ नये, असे याचिकादाराने म्हटले आहे. या प्रकल्पाला गोवा शासनाने अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही, असा दावा याचिकादारांनी केला आहे.