विवाह संस्थेवरील संकट !

पुणे शहरातील सोळाव्या वयापूर्वीच्या सरासरी ७५ टक्क्यांहून अधिक मुले-मुली एका तरी ‘रिलेशनशिप’मध्ये गुंतल्याचे ‘प्रयास’ संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले. हे सर्वेक्षण करतांना अनुमाने १ सहस्र २४० तरुण आणि तरुणी यांच्याशी संवाद साधला. यापैकी ६० टक्के तरुण-तरुणींनी ‘सीरियस रिलेशनशिप’वर विश्‍वास ठेवल्याचे नमूद केले. ही गोष्ट गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. आजची तरुणाई अश्‍लील चित्रपट, वेब सिरीज, तसेच दूरचित्रवाहिन्या यांवरील अनैतिक आणि अर्थहीन मालिका यांमुळे दिशाहीन होत आहे. यात काम करणारे कलाकार हेच त्यांचे आदर्श बनत आहेत, त्यांच्या प्रमाणेच कृती करण्याचा प्रयत्न तरुण पिढी करत आहे. आजची तरुण पिढी धर्म आणि संस्कृती यांपेक्षा पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानत आहे. आपण आपला धर्म, संस्कृती, ग्रंथ, शिक्षणपद्धत हे सर्व विसरत चाललो आहोत.

भारतीय संस्कृतीचा आधार असणार्‍या विवाह संस्थेला खिळखिळी करण्याचे काम ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ आणि ‘समलैंगिक संबंध’ यांसारख्या विकृती करत आहेत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनीही मान्यता दिल्याने जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. स्वैराचार, उपभोग, वासनांधता यांना थारा न देता खरा आनंद मिळवून देण्यात हिंदु संस्कृतीतील कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था यांचे मोठे योगदान आहे. विवाह बंधनात दायित्वाने वागण्यासह कुटुंबियांना प्राधान्य दिले जाते. ‘लिव्ह इन’मध्ये अधिकाधिक भांडणे, आत्महत्या, हत्या, ताणतणाव अशा गोष्टी घडत आहेत. यावरून आपल्या महान भारतीय संस्कृतीमध्ये विवाह बंधनाचे किती महत्त्व आहे, हे लक्षात येते. विवाहामुळे जसे वैयक्तिक आयुष्य सुखी आणि संपन्न होते, तसेच सामाजिक आयुष्यही आपोपाप घडवले जाते. हिंदु संस्कृतीऐवजी पाश्‍चात्त्य विकृती आचरणात आणल्याने त्याचे होणारे गंभीर दुष्परिणाम पुनःपुन्हा समोर येत आहेत.

आपल्या देशाचा इतिहास पाहिल्यास गार्गी, मैत्रेयी, सीता, द्रौपदी, तारा, मंदोदरी, अहिल्या अशा अनेक महान महिला होऊन गेल्या. त्यांच्या आचरणातून आपल्याला त्याग, समर्पण, प्रेम, निष्ठा आणि भक्ती यांची शिकवण मिळते. त्यांच्यातील गुणांमुळे या महिला सर्वार्थाने आदर्श ठरल्या. आजच्या महिलांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजव्यवस्था उत्तम राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

– सौ. अपर्णा जगताप, पुणे