वनमंत्री संजय राठोड यांच्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी कारवाई न झाल्यास सभागृह चालू देणार नाही ! – चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

डावीकडून चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे

मुंबई – १ मार्चपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होत आहे. त्याच्या अगोदर राज्य सरकारने वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही किंवा त्यांची चौकशी चालू केली नाही, तर आणि मुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, अन्यथा आम्ही या सूत्रावर तोंड न उघडणार्‍या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, तसेच सभागृह चालू देणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांच्या वतीने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपकडून राज्यात विविध ठिकाणी आंदोलने

मुंबई – पुण्यामधील पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातील शिवसेनेचे संशयित वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील कारवाईसह त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जात आहे; मात्र कारवाई होत नसल्याने भाजपच्या वतीने २७ फेब्रुवारी या दिवशी भाजपकडून राज्यात नाशिक, मुलुंड, गोरेगाव, तसेच पुणे आणि संभाजीनगर येथेही निदर्शने करण्यात आली.

 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न

पनवेलमध्ये आंदोलन करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कळंबोली येथे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी ३५ आंदोलकांना कह्यात घेतले. या वेळी आंदोलकांनी ‘शरद पवार, जागे व्हा’, अशा घोषणाही दिल्या होत्या.