चीनने उघूर तुर्क मुसलमानांशी योग्य व्यवहार करावा !

तुर्कस्तानने चीनला सुनावले !

तुर्कस्तानने सुनावले आणि चीनने व्यवहार सुधारला, असे कधीतरी होईल का ? चीन अमेरिकेला भीक घालत नाही, तेथे तुर्कस्तानला काय महत्त्व देणार ? तुर्कस्तान केवळ जगातील मुसलमानांना, ‘आम्ही मुसलमानांसाठी काही तरी करत आहोत’,  हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे !

जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीचे प्रवक्ते उमर चेलिक

नवी देहली – तुर्कस्तान चीनमधील शिनजियांग प्रांतातील स्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आमच्या सरकारला वाटते की, उघूर तुर्क मुसलमानांशी योग्य व्यवहार करण्यात यावा, असे विधान तुर्कस्तानमधील सत्तधारी पक्ष जस्टिस अँड डेव्हलपमेंट पार्टीचे प्रवक्ते उमर चेलिक यांनी केले आहे. चीनच्या शिनजियांगमध्ये १ कोटी उघूर मुसलमान रहातात. यात तुर्क मुसलमानांची संख्या ४५ टक्के आहे.

१. चेलिक यांनी या प्रांतातील स्थितीवर चिंता व्यक्त करत म्हटले, ‘ही चिंता दूर करण्याची एकच योग्य पद्धत आहे ती म्हणजे चीनने उघूर तुर्कांच्या विरोधातील त्याचा व्यवहार सुधारणे होय.’ चेलिक यांनी गेल्यावर्षी चीनला त्याची नीती सुधारण्यास सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, चीनने आतंकवादी आणि निर्दोष लोक यांच्यातील भेद समजला पाहिजे.

२. तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानेही म्हटले आहे की, तुर्कस्तान चीनमधील शिनजियांग प्रांतामधील मानवाधिकाराच्या होत असलेल्या उल्लंघनाविषयी चिंतेत आहे. आम्ही आशा करतो की, चीन उघूर मुसलमानांनाही नागरिक या दृष्टीने पाहील.

३. तुर्कस्तानच्या एका समितीने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७५ व्या बैठकीत उघूर मुसलमानांविषयी चिंता व्यक्त केली होती.