रेल्वे प्रवासासंबंधीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पुढे !

  • ३ वर्षांत १ लाख ३१ सहस्र ३३२ गुन्ह्यांची नोंद

  • देशभरात ३ लाख ६ सहस्र ३६८ गुन्हे नोंद


असे असेल तर रेल्वे पोलिसांना वेतन देऊन पोसायचे कशाला ? यावरून पोलीस आणि कायदा यांचा धाक गुन्हेगारांना राहिलेला नाही, हेच दिसून येते. गुन्हेगारी रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक !

मुंबई – रेल्वेस्थानक, परिसर आणि रेल्वेच्या गाड्या यांमध्ये घडणार्‍या विविध गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सर्वांत पुढे आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार वर्ष २०१७ ते २०१९ या कालावधीत महाराष्ट्रात रेल्वे प्रवासासंबंधी १ लाख ३१ सहस्र ३३२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. (याचाच अर्थ नोंद न झालेल्या गुन्ह्यांची संख्याही बरीच असेल ! – संपादक)

१. वर्ष २०१७ ते २०१९ या ३ वर्षांच्या कालावधीत देशभरात रेल्वेसंबंधी ३ लाख ६ सहस्र ३६८ गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण ३५ टक्के इतके आहे.

२. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्रात रेल्वेसंबंधी ४५ सहस्र गुन्ह्यांची नोंद लोहमार्ग पोलिसांनी केली. त्यामध्ये चोरीच्या घटना ४१ सहस्र ५३१, दरोडे १ सहस्र ६६६, फसवणुकीच्या घटना २१५, महिलांच्या छेडछाडीच्या घटना १६८, तर अपहरणाच्या ५४ गुन्ह्यांचा समावेश आहे.