स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पाण्याची समस्या हा गंभीर विषय ! – उद्धव ठाकरे

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देता न येणे, हे लोकशाही अपयशी ठरल्याचे द्योतक नव्हे का ?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाव्हाशेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन प्रसंगी उद्धव ठाकरे

पनवेल – देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पनवेल येथे २२ फेब्रुवारी या दिवशी व्यक्त केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाव्हाशेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, भविष्यात पाण्यासाठी देशांत युद्धे होतील. पाणी हेच जीवन असल्याचे लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याकरिता पाण्याची काटकसर करण्याची आवश्यकता आहे. एकीकडे माणूस चंद्रावर पाणी सापडते का ? याविषयी संशोधन करत आहे. यापेक्षा आपण ज्या भूमीवर रहातो, तेथील लोकांना मुबलक पाणी कसे उपलब्ध होईल, याकरिता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आपण केली नाही, तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल.