माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची नित्योपचार पूजा पार पडली 

श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या गाभार्‍याला फुलांची मनमोहक सजावट  

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – माघ एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्या अधिवक्त्या माधवी निगडे यांच्या उपस्थितीत, तर श्री रुक्मिणी मातेची पूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. माघ एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विविध प्रकारच्या १ टन रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले होते. या वेळी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

२४ घंट्यांच्या संचारबंदीला वारकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद !

कोरोनामुळे २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ पासून २४ घंट्यांसाठी शहरासह आसपासच्या १० गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन संचारबंदीला पंढरपूरवासीय आणि समस्त वारकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाला साहाय्य केले. पारंपरिक दिंड्या वगळता अन्य कोणतेही वारकरी मठातून बाहेर पडले नाहीत.